भाजपकडून काँग्रेसच्‍या बालेकिल्ल्याला खिंडार

मीनाक्षी गुरव - @GMinakshi_Sakal
गुरुवार, 2 मार्च 2017

दारोदारी जाऊन मतदारांच्या घेतलेल्या गाठीभेटी, प्रचारादरम्यान मांडलेला विकासाचा मुद्देसूद ‘जाहीरनामा’, मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, आत्तापर्यंत रखडलेल्या अत्यावश्‍यक विकासकामांचा घेतलेला खरपूस समाचार आणि कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध फळी यामुळेच काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औंध- बोपोडीत (प्रभाग ८) भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. आजी- माजी नगरसेवकांना पराभूत करून या प्रभागात कमळ फुलविण्यात पक्षाला यश आले.

या प्रभागातील अनुसूचित जातीच्या अ गटात सुनीता वाडेकर, नागरिकांच्या मागास प्रवर्गात (गट ब) अर्चना मुसळे, खुल्या गटात (क) विजय शेवाळे आणि ड गटात बंडू ऊर्फ प्रकाश ढोरे हे चारही उमेदवार मताधिक्‍याने विजयी झाले. काँग्रेसकडून सोनाली भालेराव, संगीता गायकवाड, आनंद छाजेड, कैलास गायकवाड; राष्ट्रवादीकडून अर्चना कांबळे, पौर्णिमा रानवडे, श्रीकांत पाटील, अशोक मुरकुटे; शिवसेनेकडून हर्षा कांबळे, प्राजक्ता गायकवाड, रामदास वाळके, अमित मुरकुटे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या चारही उमेदवारांनी एकत्रितरीत्या केलेला प्रचार ही त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल.

माजी महापौर, आजी- माजी नगरसेवक आणि जुन्या कार्यकर्त्यांची दमदार फळी काँग्रेसकडे होती; तसेच पारंपरिक मतदारांवर काँग्रेसची अधिक भिस्त होती. परंतु अनपेक्षितपणे मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केल्यामुळे एकच ‘पॅनेल’ प्रभागात चालले. भाजपच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही प्रभागात उमेदवार उभे करताना वेगळी खेळी आजमावली. राष्ट्रवादीने जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच नव्या कार्यकर्त्यांवर विश्‍वास दाखविला, तर शिवसेनेने नव्या आणि इतर पक्षांतून आलेल्यांना संधी दिल्याने अनेक विश्‍वासू कार्यकर्त्यांचे निवडणूक लढविण्याचे स्वप्न धुळीला मिळाले. त्यामुळे या दोन्ही पक्षांत काही प्रमाणात नाराजी दिसली. प्रचारादरम्यान ही नाराजी छुप्या पद्धतीने व्यक्त होत होती. भाजपमध्ये नेमकी या उलट परिस्थिती होती. या पक्षाचे चारही उमेदवार एकत्रितपणे प्रचार करत होते.

भाजपबरोबरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाही प्रभाव येथे दिसला. प्रचारासाठी भाजपकडे युवकांची मोठी फौज सक्रिय होती; तसेच महिलांचा सहभागही वाखाणण्याजोगा होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाणेरमध्ये झालेली जाहीर सभा ही देखील भाजपसाठी जमेची ठरली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रभागात दमदार प्रचार केला असला, 

तरी भाजपच्या नियोजनबद्ध प्रचारापुढे ते कमी पडल्याचेच बोलले जात आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अधिराज्य असणाऱ्या या प्रभागात ‘कमळ’ फुलले.

Web Title: BJP, Congress opening the Citadel