Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंटमधील बदल भाजपच्या पथ्यावर पडणार?

मंगेश कोळपकर
Wednesday, 2 October 2019

"कॉस्मोपॉलीटन' अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात सुमारे 2 लाख 90 हजार मतदार आहेत. शहराच्या मध्यभागापासून पूर्वेपर्यंत कोरेगाव पार्क ते घोरपडीपर्यंत हा मतदारसंघ पसरला आहे. आकाराने लहान असलेल्या या मतदारसंघात दलीत, मुस्लीम, पारशी, शीख, जैन तसेच तमिळ, तेलगू आदी मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे त्यांच्या पुढे आव्हान असेल. तसेच "एमआयएम', बहुजन वंचित आघाडी, "आप' आदी पक्षांतील मतविभागनी कोणाच्या पथ्यावर या बद्दल मतदारसंघात कुतूहल निर्माण झाले आहे.

"कॉस्मोपॉलीटन' अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात सुमारे 2 लाख 90 हजार मतदार आहेत. शहराच्या मध्यभागापासून पूर्वेपर्यंत कोरेगाव पार्क ते घोरपडीपर्यंत हा मतदारसंघ पसरला आहे. आकाराने लहान असलेल्या या मतदारसंघात दलीत, मुस्लीम, पारशी, शीख, जैन तसेच तमिळ, तेलगू आदी मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

दिलीप कांबळे सुमारे साडेचार वर्षे मंत्रिपदावर होते. त्यामुळे राज्यात त्यांचा वावर होता. पक्षाचा एकमेव मातंग चेहरा असल्यामुळे त्यांची राज्यभर भटकंती होती. परिणामी मतदारसंघाकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातही तसे आढळून आले होते. तुलनेने सुनील कांबळे यांचा मतदारसंघाशी संपर्क होता. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तर, कॉंग्रेसचे बागवे यांनी 2014 मध्ये पराभूत झाल्यापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2009 मध्ये ते येथून निवडूून आल्यामुळे त्यांना मतदारसंघाची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे मतदारसंघातील मोठे पॉकेटस्‌ असलेल्या ताडीवाला रस्ता, कासेवाडी, राजेवाडी, घोरपडी आदी भागांवर त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत केले.

"एमआयएम'ने माजी नगरसेविका हिना मोमीन, "आप'ने खेमचंद सोनावणे तर, बहुजन वंचित आघाडीने--- यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे प्रचारालाही प्रारंभ झाला आहे. महापालिका तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीतही येथे बहुसंख्य भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त होती. प्रचार यंत्रणेत त्यांना सुनील कांबळे कसे सहभागी करून घेणार, यावर या मतदारसंघात भाजपचे भवितव्य ठरणार आहे. तर कॉंग्रेसमध्ये बागवे यांची उमेदवारी अपेक्षित असल्यामुळे त्यांचे चिरंजीव आणि नगरसेवक अविनाश बागवे यांनी या पूर्वीच प्रचाराचे नियोजन करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. या मतदारसंघातून अन्य घटक पक्षांची मतविभागनी किती आणि कशी होईल, यावर येथील विजयी उमेदवार ठरेल, अशी तरी सध्या चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP contest strongly in Pune Cantonment constituency