

पुणे - ‘‘प्रभागांमधील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह अनेक छोटे प्रकल्पही रखडले आहेत, एकाच कामासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे, लोकांना काय उत्तरे द्यायची?’’ ही गाऱ्हाणी विरोधी पक्षीय नव्हे, तर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची आहेत. आज या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कानावर घालण्यात आल्या. एक-दोन नव्हे तर भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे कामकाजाबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. सत्ताधाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे नाराजी मांडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, पुण्याच्या प्रश्नांबाबत दोन- चार दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, पदाधिकारी- प्रशासनातील वादावर तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केल्याने भाजपच्या गोटात तूर्त तरी समाधान आहे.
मुख्यमंत्री शनिवारी कार्यक्रमासाठी आले असता, पक्षाच्या बहुतांशी नगरसेवकांनी त्याला आर्वजून हजेरी लावली. कार्यक्रम संपताच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा आग्रह धरला. मात्र, एवढ्या नगरसेवकांना भेटणे शक्य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
प्रशासनाच्या दिशेने नेम
महापालिका सभागृहातील संख्याबळाचे बहुमताचे अस्त्र उपसत सत्ताधारी भाजपने प्रशासनाच्या दिशेने आता पुन्हा नेम धरला असून, प्रशासनाबाबत ढीगभर तक्रारी मांडून, न्यायाची अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. महापालिकेतील कुरबुरी फारशा मनावर न घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तक्रारदारांना थेट ‘वर्षा’वर हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे फर्मान सोडले. मुख्यमंत्र्यांची सूचना मनावर घेऊन महापालिकेतील प्रमुख प्रशासनाविरोधात ‘दारूगोळा’ जमविण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.