

PNE26W60374
सोलापूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करताना पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्यासह पदाधिकारी.
PNE26W60375
सोलापूर : श्री काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचे आशीर्वाद घेताना पालकमंत्री जयकुमार गोरे.
भाजपची संस्थाचालकांशी ‘जोडणी’
मंत्री पाटील यांच्याकडून भेटी; महायुतीच्या उमेदवारांसाठी सहकार्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराची यंत्रणा सक्रिय केली असून, शिक्षण संस्थाचालकांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. १९) शहरातील प्रमुख शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत महायुतीच्या उमेदवारांसाठी सहकार्य मागितले. संस्थाचालकांनीही सहकार्याची ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले.
महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रचार नियोजनाचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता शिक्षण संस्थाचालक, शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती पक्षाकडून राबवली जात आहे.
दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री पाटील यांनी सोमवारी सकाळी वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजित गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी संस्थेचे सचिव पराग शहा, पृथ्वीराज गांधी आणि वैभव गांधी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांची भेट घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी प्रशालेतील दसरा महोत्सवातही पाटील यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
चौकट
पाटील, गोरे यांची जगद्गुरूंची स्वतंत्र भेट
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन दर्शन घेतले. पाटील यांच्यासमवेत मोहन डांगरे उपस्थित होते. पालकमंत्री गोरे आणि भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जगद्गुरूंसमवेत चर्चा केली. या वेळी आमदार देवेंद्र कोठे, पक्षनेते नरेंद्र काळे, सभापती रंजिता चाकोते आणि सरचिटणीस सुधा अळ्ळीमोरे आदी उपस्थित होते.
सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची आरती करून दर्शन घेतले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्यासाठी बळ मिळावे, त्यांच्या कष्टांना फळ मिळावे आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानच्या वतीने प्रभुराज मैंदर्गी यांनी त्यांचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.