Loksabha 2019 : कॉंग्रेस आघाडीने रखडवलेला विकास भाजपने केला - बापट 

Loksabha 2019 :  कॉंग्रेस आघाडीने रखडवलेला विकास भाजपने केला - बापट 

पुणे -  ""कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहामुळे गेली 15 वर्षे पुण्याचा विकास रखडला होता. रखडलेले प्रकल्प आम्ही गेल्या साडेचार वर्षांत मार्गी लावले. कॉंग्रेसकडे बोलायला काहीच नसल्याने त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मोहन जोशी यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत,'' अशी टीका महायुतीचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज केली. 

लोकसभेच्या प्रचाराची सांगता करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरेसवक मुरलीधर मोहोळ, अजय भोसले या वेळी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ""कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात दूरदृष्टीचा आणि राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव होता. अजित पवार, सुरेश कलमाडी यांच्यातील वाद, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यातील श्रेयवाद, आघाडीतील कलहामुळे गेली 15 वर्षे पुण्याच्या विकास आराखड्यासह (डीपी) विकास रखडला. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अध्यक्षपदावरूनही पवार- चव्हाण यांच्यात वाद होता; पण आम्ही "पीएमआरडीए'ही मार्गी लावले.'' 

""भाजप सत्तेत आल्यानंतर "ई-बस' घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मेट्रोच्या तीन मार्गांचे काम सुरू झाले आहे. डीपी, समान पाणीपुरवठा, एचसीएमटीआर प्रकल्प, विमानतळ, उड्डाण पूल अशी एकूण 80 हजार कोटींची कामे पुणे शहराच्या परिसरात सुरू आहेत. आघाडीच्या काळात हे प्रकल्प झाले नाहीत. भाजप युतीने हे करून दाखवले. मात्र, विरोधकांनी आमच्या कामाची टिंगलटवाळी केली,'' असे ते म्हणाले. 

""विरोधी उमेदवाराने सुरवातीपासून माझ्यावर वैयक्तिक टीका केली. आम्ही वैयक्तिक टीका न करता, शिवराळ भाषेचा वापर न करता सकारात्मक प्रचार केला. एक तर कॉंग्रसेला उमेदवार मिळत नव्हता, मिळाला तर त्यांचे कोणी काम करायला तयार नव्हते. त्यांनी माझ्यावर केलेल्या टीकेला 23 मे रोजी उत्तर मिळेल,'' असा टोला बापट यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com