'चंपादाजी' पुण्यात व्हायरल; तुम्ही व्हिडिओ पाहिला का?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील नंबर दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येत मनसेचे किशोर शिंदे यांना पाठबळ दिले आहे.

पुणे : राज्याच्या राजकारणात 'चंपा' शब्दावरून उलट-सुलट वक्तव्ये होत असताना कोथरूडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारात वापरण्यात येत असलेल्या "चंपादाजी' व्हिडीओमुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. शांताबाई या गाण्याच्या चालीवर "चंपादाजी' हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे अन हा तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील नंबर दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येत मनसेचे किशोर शिंदे यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात थेट लढत होत आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीनेही शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे धास्तावलेल्या भाजपने विशेष यंत्रणा येथे लावली आहे. चंद्रकांत पाटील यांना "चंपा' असे भाजपचेच मंत्री म्हणतात, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर तयार झालेल्या "चंपादाजी' व्हिडीओमध्ये चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. तसेच सांगली- कोल्हापूरवरून ते वाहत आले आहेत, कोणी त्यांना तेथे थारा दिलेला नाही, अशा आशयाच्या वक्तव्याला चाल दिली देण्यात आली आहे. हा व्हिडीओ ऐकताना "शांताबाई' गाणं सुरू आहे, असा भास होतो. मनसे आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या बाबत मनसेचे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया म्हणाले, "व्हिडीओ कोणी तयार केला ते माहिती नाही. पण, कोथरूडमधील प्रत्येक मतदारापर्यंत हा व्हिडीओ पाठविण्याचा प्रयत्न सुरू आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Chandrakant Patil video viral on social media