
मांडवगण फराटा : गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला असून भारतीय जनता पार्टीचे शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी आपण तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपविला असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दादा पाटील फराटे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याबाबत खासगीत चर्चांना उधाण आले होते. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळत नव्हती. अखेर दादा पाटील फराटे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपविला असल्याचे सांगितले.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, "गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम निष्ठेने पार पाडत होतो. काम करीत असताना स्वार्थाची भूमिका कधीच ठेवली नाही. गेले दोन वर्षे माझ्याकडे शिरूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार सातत्याने शिरूर तालुक्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले, पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु सध्या माझ्या कौटुंबिक जबाबदारीमुळे मला पदासाठी वेळ देणे शक्य होत नाही. काम करायला पुरेसा वेळ मिळत नाही. या अडचणीमुळे मी पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपविला आहे."
पुढील वाटचालीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, "आजपर्यंत निष्ठा ठेवून माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासोबत पद असो अथवा नसो काम केले आहे. त्यामुळे यापुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा अद्याप विचार केला नाही." असे सांगत त्यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
दादा पाटील फराटे यांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाचे कामकाज पाहिले आहे. तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी पार पाडली आहे.
दादा पाटील फराटे यांनी राजीनामा दिल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका काय राहणार, तसेच तालुक्यात मोठ्या घडामोडी होऊन राजकारणाची गणिते बदलणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.