शक्तिप्रदर्शनासाठी जमवाजमव करा; 'महाजनादेश' यात्रेसाठी भाजपचे फर्मान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

अडीच हजार दुचाकी... एक हजारांहून अधिक महिला... नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी जेवढी गर्दी करता तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक पुण्यात करायची आहे, असे फर्मान शहराच्या पदाधिकाऱ्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत प्रत्येकाला शहर भाजपकडून काढले आहे. कारण येत्या शनिवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुण्यात दाखल होत आहे. त्यासाठीच्या लवाजम्याची ही तयारी आहे.

पुणे - अडीच हजार दुचाकी... एक हजारांहून अधिक महिला... नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी जेवढी गर्दी करता तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक पुण्यात करायची आहे, असे फर्मान शहराच्या पदाधिकाऱ्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत प्रत्येकाला शहर भाजपकडून काढले आहे. कारण येत्या शनिवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुण्यात दाखल होत आहे. त्यासाठीच्या लवाजम्याची ही तयारी आहे.

महापालिका निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात ठेवली होती.

भरदुपारी ठेवलेल्या या सभेला पुणेकरांनी पाठ फिरवली होती. त्या वेळी हा चर्चेचा विषय झाला होता. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा सायंकाळी पाचच्या सुमारास एका हायस्कूलच्या मैदानावर झाली होती. त्या सभेलाही गर्दी जमली नव्हती; तर दुसरे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची कोथरूड येथील सभेच्या वेळेसही असाच काही प्रकार घडला होता. त्यामुळे ऐनवेळी पळापळी करूनही गर्दी जमवावी लागली होती. हे सर्व अनुभव लक्षात घेता, महाजनादेश यात्रेवेळी "रिक्‍स' नको, यासाठी शहर भाजपकडून पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.

त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाकडून प्रभारी नेमले आहेत. मंगळवारी या आठही प्रभारींवर ही यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी मतदारसंघात बैठका घेतल्या. त्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी अडीचशे दुचाकी; तर पदाधिकाऱ्यांनी मिळून पाचशे गाड्या अशा अडीच हजार दुचाकी, महिला आघाडीने किमान एक हजार महिला; तर प्रत्येक नगरसेवकावर स्वतंत्रपणे गर्दी जमवावी, असे फर्मान सोडले आहे.

यात्रेच्या निमित्ताने शहर भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या यात्रेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mahajanadesh Yatra Power Presentation Politics