ईवनाते आणि वाडकुटे यांना राज्यसभेची संधी भाजपकडून चार नावे जाहीर; आठवले व तावडेंनाही उमेदवारी
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ४ : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांपैकी चार जागांसाठी भाजपने सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, विदर्भातील नेत्या माया चिंतामण ईवनाते आणि मराठवाड्यातील नेते रामराव वाडकुटे या चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी १६ मार्चला मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या (ता. ५) आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकांसाठी आपली यादी आज जाहीर केली. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वाडकुटे यांच्या उमेदवारीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे या नावांची घोषणा करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सहयोगी असून त्यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. भाजपने आपल्या कोट्यातून त्यांना उमेदवारी दिल्याने आठवले यांचे मंत्रिपद शाबूत राहणार आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणातून केंद्रीय राजकारणात आलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा या निमित्ताने संसदेत प्रवेश होणार आहे.
संख्याबळानुसार महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील तर, एक जागा महाविकास आघाडीकडे राहील. भाजपने चार जागांची घोषणा केल्यानंतर आता मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर होणे बाकी आहे. तर, महाविकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सहमती झाली असल्याने राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपचे इतर उमेदवार
भाजपने देशपातळीवर एकूण नऊ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली होती. त्यात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि शिवेश कुमार यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली. नवीन हे सध्या बंकिपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, राज्यसभेत निवड झाल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. दुसरे उमेदवार शिवेश कुमार हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असून, ते माजी आयएएस अधिकारी आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सासाराम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या व्यतिरिक्त आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, हरियानामधून संजय भाटिया, ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजीत कुमार, तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

