भाजपमध्ये सावंत Vs रोंगे रस्सीखेच, तर महाविकास आघाडीत विद्यमान आमदार आसगावकरांबाबत संभ्रम

भाजपमध्ये सावंत Vs रोंगे रस्सीखेच, तर महाविकास आघाडीत विद्यमान आमदार आसगावकरांबाबत संभ्रम
Published on

जयंत आसगावकर यांचे छायाचित्र
UPR२६B०८७३६ : दत्तात्रय सावंत
UPR२६B०८७३८ : बी. पी. रोंगे
UPR२६B०८७३७ : महेश चिवटे

भाजपकडून उमेदवारीसाठी सावंत-रोंगे यांच्यात रस्सीखेच
महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत संभ्रम; एकट्या सोलापूर जिल्ह्यात २६ टक्के मतदार

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २२ : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आला आहे. या मतदारसंघातील सर्वाधिक मतदार सोलापूर जिल्ह्यात आणि भाजपमधील दोन्ही प्रमुख इच्छुकही सोलापूरचेच असल्याने ही निवडणूक सोलापूरभोवतीच फिरणार, हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि डॉ. बी. पी. रोंगे या दोघांमध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सावंत आणि रोंगे यांनी गाठीभेटी आणि बैठका घेण्यावर जोर लावला आहे.
आतापर्यंत अपक्ष लढणारे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी यावेळी प्रथमच पक्षाकडून, विशेषतः भाजपकडून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे डॉ. बी. पी. रोंगे हे देखील अनेक महिन्यांपासून भाजपकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून आहेत. दोन्ही उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील असल्याने भाजप श्रेष्ठी कुणाला पसंती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनीदेखील पुन्हा दंड थोपटले आहेत. ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, आमदार आसगावकर यांच्या मागील कामकाजाबाबत शिक्षक मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा आसगावकर यांनाच उमेदवारी देणार की शिक्षकांची नाराजी लक्षात घेऊन नव्या दमाच्या, नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडेही संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे. यंदा एकूणच पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. यामध्ये डॉ. रोंगे यांच्यासह शिवसेनेचे मंगेश चिवटे यांचाही समावेश आहे. चिवटे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांच्या भेटीगाठी घेत निवडणुकीची तयारी केली आहे.

....

चौकट...
सोलापूरमध्ये सर्वाधिक १३ हजार ४८० मतदार
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सोलापूर निर्णायक ठरणार आहे. पुणे विभागात सर्वाधिक शिक्षक मतदारांची संख्या सोलापूर जिल्ह्यात आहे. एकूण ५२ हजार ४९० मतदारांपैकी एकट्या सोलापूर जिल्ह्यात २६ टक्के मतदार आहेत. जो उमेदवार सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेईल, तोच विधान परिषदेवर जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

चौकट...
जिल्हानिहाय मतदार संख्या
सोलापूर : १३ हजार ४८० (सर्वाधिक)
पुणे : १२ हजार २७६
कोल्हापूर : १० हजार ३९९
सातारा - नऊ हजार ८०
सांगली - सात हजार २५५

चौकट...
२०२० चा निकाल काय होता...
२०२० साली पार पडलेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण ७२,५४६ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ५२,९८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये जयंत आसगावकर (विजयी, महाविकास आघाडी) : १६,८७४ मते, दत्तात्रय सावंत (अपक्ष) : १३,७६० मते, जितेंद्र पवार (भाजप) : ५,७९५ मते मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com