Vidhan Sabha 2019 : उमेदवारांचा शत प्रतिशतचा नारा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

विधानसभा 2019 
भाजपने शहरातील आठही मतदारसंघांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व ठिकाणचे उमेदवार जाहीर केले. गेल्या पाच वर्षांच्या कामाच्या जोरावर या उमेदवारांनी पुण्यात पुन्हा एकदा शत प्रतिशतचा नारा दिला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी पुणेकर मला परका मानणार नाहीत, असा विश्‍वास व्यक्त केला.
  

विधानसभा 2019 
भाजपने शहरातील आठही मतदारसंघांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व ठिकाणचे उमेदवार जाहीर केले. गेल्या पाच वर्षांच्या कामाच्या जोरावर या उमेदवारांनी पुण्यात पुन्हा एकदा शत प्रतिशतचा नारा दिला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी पुणेकर मला परका मानणार नाहीत, असा विश्‍वास व्यक्त केला.
  
चंद्रकांत पाटील (कोथरूड) - माझे १९८२ पासून पुण्यात जाणे-येणे आहे. गेल्या १२ वर्षांपासून पुण्याचा पदवीधर आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. पुण्याचा पालकमंत्री आहे. कोथरूड व पुणे माझ्याएवढे कोणालाही माहिती नाही. पुणेकर मला परका मानणार नाहीत. ते मला नक्की निवडून देतील, असा विश्‍वास आहे. 

माधुरी मिसाळ (पर्वती) - पर्वती मतदारसंघातून मी दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. पक्षाने मला पुन्हा संधी दिली. या वेळी माझ्यासह शहरातील आठही उमेदवार पुन्हा निवडून येतील.

मुक्ता टिळक (कसबा) - अडीच वर्षांपासून पुण्याची महापौर म्हणून पुणेकरांनी मला भरपूर प्रेम दिले. हेच प्रेम मला निवडणुकीच्या काळातही मिळेल. कसब्यातून मला निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याबद्दल पक्षाचे आणि नेत्यांचे धन्यवाद. 

योगेश टिळेकर (हडपसर) : गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाच्या जोरावर हडपसर मतदारसंघातून पुन्हा भाजपचा विजय निश्‍चित आहे. मतदारांचा आशीर्वाद आणि मदतीने मी प्रचंड बहुमताने निवडून येईन. 

जगदीश मुळीक (वडगाव शेरी) - पाच वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी या दोन्ही कामाची पावती मला पक्षाने दिली आहे. पक्षाने दाखविलेला विश्‍वास सार्थ करू. जास्तीत जास्त मताधिक्‍क्‍याने निवडून येईन.

भीमराव तापकीर (खडकवासला) - या मतदारसंघातून आठ वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांची दखल पक्षाने घेतली. त्यामुळे मला पुन्हा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. मतदारही माझ्यावर विश्‍वास दाखवतील, अशी मला आशा आहे. 

सुनील कांबळे (कॅंटोन्मेंट) : गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मतदारसंघाचा व पुण्याचा विकास केला. त्यांच्या कामाच्या जोरावर कॅंटोन्मेंट मतदारसंघातून पुन्हा भाजपचा विजय निश्‍चित आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे मी सोने करणार आहे.

सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर) : पक्षाने मला यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवकपदाची, त्यानंतर पीएमआरडीए, पीएमपीच्या संचालकपदावर काम करण्याची संधी दिली. तेथील कामाची दखल घेत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना मतदार पाठिंबा आणि आशीर्वाद देऊन बहुमताने विजयी करतील, असा माझा विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp Pune Candidate