पदवीधर मतदारसंघ : सर्वाधिक मतदार असूनही पुण्याला हुलकावणी 

मंगेश कोळपकर
Monday, 9 November 2020

पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदार पुण्यात आहेत. तरीही या उमेदवारीने शहराला पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भाजपचे पुण्यातील इच्छुक नाराज झाले आहेत.

पुणे : पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदार पुण्यात आहेत. तरीही या उमेदवारीने शहराला पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भाजपचे पुण्यातील इच्छुक नाराज झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपने पदवीधर मतदारसंघासाठी पुणे विभागातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख, नागपूरमध्ये महापौर संदीप जोशी आणि औरंगाबादमध्ये सतीश बोराळकर यांना सोमवारी उमेदवारी जाहीर केली. तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. 

नागपूर, औरंगाबादमध्ये ब्राह्मण समाजाला उमेदवारी मिळाल्यामुळे पुणे विभागासाठी मराठा समाजाला उमेदवार मिळणार, हे चार दिवसांपूर्वीच भाजपच्या वर्तुळात निश्‍चित झाले होते. त्यामुळे संग्रामसिंह देशमुख आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. त्यामुळे पुणे शहर भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे यांचे नाव आपोआपच मागे पडले. या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यापूर्वी विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम ठरला अन देशमुख यांना उमेदवारी मिळाली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे पाच लाख 15 हजार मतदार असलेल्या पदवीधर मतदारसंघात पुण्यात सुमारे एक लाख 50 हजार मतदार आहेत. तर सांगलीतून एक लाख पाच हजार, कोल्हापूरमधून 96 हजार, साताऱ्यातून 85 तर सोलापूरमधून 79 हजार मतदार आहेत. पुण्यातून सर्वाधिक मतदार असल्यामुळे येथूनच उमेदवार द्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी पक्षसंघटनेकडे धरला होता. पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत सुमारे 15 टक्के मतदान झाले होते. यंदा पुण्यातून चांगल्या प्रकारे मतदान झाल्यास भाजपसाठी ते निर्णायक ठरू शकेल. 

अशी असेल निवडणूक 
- उमेदवारी अर्ज दाखल ः 12 नोव्हेंबरपर्यंत 
- छाननी ः 13 नोव्हेंबर 
- अर्ज मागे घेण्याची मुदत ः 17 नोव्हेंबर 
- मतदान ः 1 डिसेंबर 
- मतमोजणी ः 3 डिसेंबर

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP rejected aspiring candidates for the graduate constituency in Pune