

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची छायाचित्रे वापरावीत.
‘केडर’शी दुरावा; भाजपचा पुन्हा पराभव!
नाराज कार्यकर्त्यांची उदासीनता, मतदार नोंदणीतच पिछाडी; उमेदवारीपासून प्रचारापर्यंतच्या निर्णयांचा फटका
अप्पासाहेब हत्ताळे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावली. वरिष्ठ नेत्यांचे नियोजन, मंडल अध्यक्षांची यंत्रणा आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदान वाढविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, पक्षाच्या मूळ ‘केडर’शी वाढलेला दुरावा, पक्षातील आयात नेत्यांचे वाढते प्रस्थ, निष्ठावंत इच्छुकांना डावलून बाहेरील उमेदवाराला दिलेली संधी, त्यानंतर पक्षात दिलेला प्रवेश आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी, यामुळे पदवीधर मतदारसंघात भाजपला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. मतदार नोंदणीपासूनच सुरू झालेली पिछाडी मतदानाच्या दिवशीही भरून काढता आली नाही. याउलट, शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ‘छुप्या रणनीती’ला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गतवेळी पक्षाच्या पारंपरिक ‘केडर’ला डावलून उमेदवारी दिल्यानंतर भाजपला ही जागा गमवावी लागली. त्यातून धडा घेण्याऐवजी पुन्हा उमेदवारीच्या निर्णयावरून सुप्त नाराजी वाढली. पक्षात वाढलेले आयातांचे प्रस्थ आणि सत्ता असतानाही निष्ठावंतांना डावलले जाण्याची भावना, यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांसह परिवारातील संस्था-संघटनांनी मतदार नोंदणीत अपेक्षित सहभाग घेतला नसल्याचे चित्र दिसले.
चौकट...
नोंदणीतच पिछाडी; यंत्रणा लावूनही प्रतिसाद नाही
जिल्ह्यात ४९ हजार ७३२ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली. त्यातील किती मतदार भाजपच्या विचारांचे आहेत, हा पक्षासाठी आत्मपरीक्षणाचा विषय ठरला. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात अपेक्षित पकड मिळवता आली नाही. त्यानंतर मतदान वाढविण्यासाठी मंडल अध्यक्षांमार्फत नियोजनबद्ध यंत्रणा उभारण्यात आली. मंत्र्यांसह संघटनेतील नेत्यांकडे विभागनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सोलापुरात येऊन दोन्ही जागा जिंकण्यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ‘सगळ्या नीती’ वापरण्याचे आवाहन केले. मात्र, संघटनात्मक नियोजन आणि प्रत्यक्ष मतदानातील सहभाग यांत तफावत राहिली. संघ परिवारातील विद्यार्थी संघटनेसह विविध संस्था-संघटनांनी मतदार नोंदणीपासून मतदान घडवून आणण्यापर्यंत अपेक्षित सक्रियता दाखवली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना मतदार नोंदणीसाठी ‘आर्थिक प्रोत्साहन’ देण्याची वेळ आली. तरीही नोंदणीला मर्यादित प्रतिसाद मिळाल्याने पक्षाच्या संघटनात्मक समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
चौकट...
उमेदवारीभोवती नाराजी; प्रचारही उशिरा
पक्षात अनेक निष्ठावंत इच्छुक असताना नवख्या डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या पुरोगामी प्रतिमेमुळे हिंदुत्ववादी मतदारांमध्ये नाराजी होती. त्यांच्या कुटुंबाचा इतिहास आणि पक्षाशी असलेले संबंध अधोरेखित करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला; मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचेच निकालावरून दिसून येते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉ. जाधव सोलापूरला आल्या नाहीत. स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दौरा केला. त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या बाहेरील पथकापासूनही स्थानिक कार्यकर्ते दूर राहिल्याचे चित्र होते. पदवीधर मतदारसंघातील तरुणांमध्ये पेपरफुटीच्या घटनांबाबत असलेली नाराजीही मतदानावर परिणाम करणारा घटक ठरल्याची चर्चा आहे. एकीकडे शिक्षक मतदारसंघासाठी नीती ‘प्रभावी’ ठरली, तर दुसरीकडे पदवीधर मतदारसंघात नाराजी, नोंदणीतील उदासीनता आणि उमेदवारीबाबतची नाराजी यांचा सामना करावा लागला. त्यामुळे या निकालाने भाजपसमोर केवळ निवडणूक जिंकण्याचे नव्हे, तर मूळ कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे आव्हान उभे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.