कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा दावा, कॉंग्रेसचा विरोध का?

गजेंद्र बडे
Thursday, 24 September 2020

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी (ता.23) पुण्यात पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांच्या या स्वातंत्र्याला कॉंग्रेसचा विरोध का, असा सवाल उपाध्ये यांनी केला.

पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी (ता.23) पुण्यात पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांच्या या स्वातंत्र्याला कॉंग्रेसचा विरोध का, असा सवाल उपाध्ये यांनी केला.

या विधेयकाला विरोध करणाऱ्या कॉंग्रेसने सत्तेत असताना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत ? कॉंग्रेस हे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मक्तेदारीसाठी आग्रही आहे का? शेतकरी स्वतंत्र व्हावा, असे वाटत नाही का ? बाजार समित्यांचा कायदा मागे घेण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनाचे काय आणि हरियानात सत्तेत असताना 2007 मध्ये कंत्राटी शेती सुरू झाली नव्हती का? या पाच प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

उपाध्ये म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना मर्जीनुसार माल विकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच विधेयके तयार केली आहेत. या कृषी सुधारणा विधेयकांना विरोध करत कॉंग्रेस हा पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे कॉंग्रेसनेच त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. खंडीभर पिकवून टीचभर पैसा मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची सुटका या विधेयकामुळे होणार आहे.

गेली अनेक वर्षे शेतकरी हा बाजार समितीतील दलालांच्या तावडीत सापडला होता. शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रीसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची आहे. याबाबतचे वाद सोडविताना शेतकऱ्यांचे हित जपले जाईल, यास विधेयकात प्राधान्य देण्यात आले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state chief spokesperson Keshav Upadhyay claimed that the agriculture bill would give freedom to farmers