कोथरूडमधील बहिणींना साड्या वाटणारच : चंद्रकांत पाटील 

मंगेश कोळपकर
Monday, 28 October 2019

कोथरूडमध्ये 24 पैकी 18  नगरसेवक भाजपचे आहेत. त्यांच्या माध्यमातून या साड्या काही वस्ती भागातील महिलांना देण्याचा त्यांचा उद्देश होता. परंतु काही नगरसेवकांनी त्याला दबक्या आवाजात विरोध दर्शविला आहे.

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील किमान दोन ते तीन हजार महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम वाटपाआधीच चर्चेच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कोथरूडमध्ये 24 पैकी 18  नगरसेवक भाजपचे आहेत. त्यांच्या माध्यमातून या साड्या काही वस्ती भागातील महिलांना देण्याचा त्यांचा उद्देश होता. परंतु काही नगरसेवकांनी त्याला दबक्या आवाजात विरोध दर्शविला आहे. दोन-तीन हजार महिलांना साड्या दिल्या तर उर्वरित महिलांना साड्या कोण देणार? ज्यांना साड्या मिळणार नाही, त्यांचा रोष कोण पत्करणार? त्या मुळे साड्या वाटण्याचा उपक्रम नको, असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. परिणामी मोफत साड्या वाटण्याचा उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात चर्चेचा झाला आहे.

या बाबत पाटील यांच्याशी 'सकाळ'ने संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ''निवडणुकीच्या आधी मी साड्या वाटल्या असत्या तर ते चुकीचं झालं असतं. परंतु भाऊबीज म्हणून आर्थिक मागास माझ्या बहिणींना साड्या द्यायचा असेल, तर त्यात कोणाची काही हरकत नसावी, असे मला वाटते. साड्या वाटपासाठी मदत करा म्हणून मी माझ्या खूप मित्रांना आवाहन केले आहे, त्याला प्रतिसाद देत ते मला साड्या देत आहेत. मी त्यामुळे कोथरूडमध्ये मी साड्या वाटणारच आहे.'' कोथरूडमध्ये 550 सोसायट्यांच्या प्रतिनिधींना नुकतेच सोलर दिवेही दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state president Chandrakant Patil distribute sarees in Kothrud Pune