वाई:-यशवंतनगर जिल्हा परिषद गट विश्लेषण:-

वाई:-यशवंतनगर जिल्हा परिषद गट विश्लेषण:-

Published on

राष्ट्रवादीच्या नाराजांवर भाजपची मदार

यशवंतनगर गटात इच्‍छुकांची भाऊगर्दी; बदलत्‍या समीकरणांमुळे सावध पावले

विठ्ठल माने : सकाळ वृत्तसेवा
वाई शहर, ता. १७ : बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा परिषदेचा यशवंतनगर गट आणि पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण खुले झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादीतीलच काही नाराजांच्या माध्यमातून भाजप या बालेकिल्ल्याला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांतील यशामुळे उत्साहित झालेला भाजपकडून राष्ट्रवादीची तालुक्यात असलेली मजबूत बांधणी खिळखिळी करण्यासाठी रणनीती आखण्‍याचे प्रयत्‍न होत आहेत, तर राष्ट्रवादीने कार्यकर्ता मेळावे, इच्छुकांच्या मुलाखती घेत सुरुवातीला आघाडी घेतली असली, तरी बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आता पक्षाकडून अधिक सावध पावले टाकली जात असल्‍याचे दिसते. अतिवृष्टीच्या काळात केलेली मदत, वाहून गेलेले रस्ते व पूल यांची पुनर्बांधणी, जोर व जांभळी खोऱ्यांना जोडणारा धोम धरणालगतचा प्रलंबित पूल असा विकासकामांचा झपाटा, त्यासोबतच व्यापक जनसंपर्क, सुख- दुःखातला सहभाग आणि खासदार नितीन पाटील यांच्या माध्यमातून सहकारी संस्थांवरील पकड यामुळे मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील गावागावांत राष्ट्रवादीचे संघटन भक्कम असल्याचे मानले जाते.

टीमवर्क ठरणार ड्रिमवर्क?
यशवंतनगर व पसरणी गटांतील मोठ्या गावांचा कल निवडणुकीवर निर्णायक प्रभाव टाकू शकतो. वाई नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरस ठरलेले अनिल सावंत यांचा यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत संपर्क आहे, तर रिपब्लिकन पक्षाचे स्वप्नील अशोक गायकवाड हे पसरणी गावातून पुढे येत आहेत. यशवंतनगर गण अनुसूचित जातीच्या पुरुषांसाठी आरक्षित आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सत्तेच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या स्वप्नील गायकवाड यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? याबाबत येथे उत्सुकता आहे. राज्यात भाजप- रिपब्लिकन पक्षाची (आठवले) युती असल्याने भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला मूकसंमती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गणात मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे टीमवर्क ‘ड्रीमवर्क’ ठरणार का? याचे उत्तर निकालानंतरच मिळेल.

बापू शिंदेंच्‍या भूमिकेकडेही लक्ष
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार संबंधित मतदारसंघातील स्थानिक रहिवासी असावे, असा सूर राष्ट्रवादीतून निघत आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रांत डोंगरे हे अभेपुरी गणातून पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी दिल्यास काही इच्छुक भाजपकडे वळण्याची शक्यता असल्याने त्यांना थोपविण्याचे आव्हान मकरंद पाटील यांच्यापुढे असेल. वाई पालिका निवडणुकीपर्यंत शिवसेनेसोबत असलेले बापू शिंदे यांचा प्रभाव या मतदारसंघात कितपत कामी येईल आणि ते महायुतीचा प्रचार करणार की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडेही लक्ष लागले आहे.

एकत्र ठेवण्‍याचे आव्‍हान
जिल्हा परिषद गटात मकरंद पाटील यांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळे यापूर्वी थांबलेले निकटवर्तीय कार्यकर्ते आनंद चिरगुटे हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबईसह अनेक मोठ्या गावांतून इच्छुक असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना थांबवून पक्षाच्या विजयासाठी एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हानही मकरंद पाटील व राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. जांभळी खोऱ्यातील शेती पाण्याचा प्रश्न, पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि अखंडित वीजपुरवठा हे या गटातील प्रमुख प्रश्न असून, मार्चनंतर त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास मंत्री मकरंद पाटील यांनी व्‍यक्‍त केला आहे.

इच्छुक चेहरे असे
यशवंतनगर गटासाठी : राष्ट्रवादीकडून आनंद चिरगुटे, मयूर चव्हाण, रोहित वाडकर
यशवंतनगर गणासाठी : राष्ट्रवादीकडून संजय कांबळे, रिपब्लिकन पक्षाकडून स्वप्नील गायकवाड
अभेपुरी गणासाठी राष्ट्रवादीकडून विक्रांत डोंगरे, पंकज वाडकर, अशोक मांढरे.

भाजपकडून अद्याप चाचपणी सुरू.
------ ------------------------------------------------
फोटो : ............
विक्रांत डोंगरे, WAI26B07475
आनंद चिरगुटे, WAI26B07476
अशोक मांढरे WAI26B07478
स्वप्नील गायकवाड, WAI26B07474
रोहित वाडकर WAI26B07479
मयूर चव्‍हाण : व्‍हॉट्‌स ॲपवर
............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com