पुण्यात चार मतदारसंघात भाजपपुढे आघाडीचे आव्हान 

BJP will face challenge of Congres NCP alliance in 4 Constituency in Pune
BJP will face challenge of Congres NCP alliance in 4 Constituency in Pune

पुण्यात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले असले, तरी कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी किमान चार मतदारसंघात त्यांच्यापुढे तुल्यबळ आव्हान उभारण्याच्या तयारीत आहे. आघाडीचे जागा वाटप जवळपास ठरले असून, त्या दृष्टीने इच्छुकांची मोर्चेबांधणीही सुरू झाली. पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघांत आघाडीचे उमेदवार जोरदार लढत देतील, असा अंदाज आहे. 

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत पाचही प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले होते. शेवटच्या टप्प्यात उमेदवार निवडीवरून सर्वच पक्षात धावपळ उडाली. मोदी लाट आणि राज्यातील तत्कालिन आघाडी सरकारविरुद्धचे वातावरण याचा फायदा उठवित भाजपने शहरातील आठही मतदारसंघांत विजयश्री मिळविली. त्यानंतर चार नगरसेवकांचा प्रभाग करीत महापालिका निवडणुकीत भाजपने विरोधकांना धूळ चारली. लोकसभा निवडणुकीतही भाजपने सहजपणे विजय मिळविला. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या साह्याला होते. येत्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना युती पुन्हा सत्तेवर येईल, असे राजकीय वातावरण राज्यात सर्वत्र आहे. अशा बिकट परिस्थितीत भाजपशी दोन हात करण्याची तयारी आघाडीच्या इच्छुकांनी केली आहे. 

आघाडीचे कार्यकर्ते भानावर 
भाजप व शिवसेनेचे शहराच्या काही भागात वर्चस्व असले, तरी पुण्यात एकेकाळी कॉंग्रेसचा दबदबा होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढली ती उपनगरांमध्ये. दहा वर्षांपूर्वी शहरातील सहा विधानसभा मतदारसंघाचे आठ मतदारसंघ झाले, तेव्हा शहरात भाजपला अनुकूल स्थिती झाली, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आपापसांत लढत बसले. त्याचा फायदा युतीच्या विशेषतः शिवसेनेच्या उमेदवारांना झाला. लोकसभा निवडणुकीतही उमेदवार निवडीवरून कॉंग्रेसमध्ये ताकद नसतानाही विनाकारण गोंधळ झाल्याचे दिसून आले. मात्र, सत्ता गेल्यानंतर आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते भानावर आले आहेत. 

त्याचा परिणाम आता आघाडीतील एकोपा वाढविण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत जादा मते घेतलेल्या पक्षाला मतदारसंघ देण्याची तयारी आघाडीतील पक्षांनी घेतल्यामुळे, कॉंग्रेसकडे कसबा पेठ व पुणे कॅन्टोन्मेंट, तर राष्ट्रवादीकडे हडपसर व वडगाव शेरी जाणार आहेत. कसबा व कॅन्टोन्मेंट कॉंग्रेसकडे जाणार असल्याचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना स्पष्ट केले. खडकवासला राष्ट्रवादीकडे, तर शिवाजीनगर कॉंग्रेसच्या वाट्याला जाईल. पर्वती सध्यातरी कोणाकडे जाईल ते सांगता येत नाही, तर कोथरूड या भाजपच्या बालेकिल्ल्यात लढण्यास फारसे कोणी इच्छुक नाही. 

मनसेचा आघाडीत समावेश?
आघाडीतील मित्रपक्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश झाल्यास आघाडीची ताकद वाढणार आहे. मनसे हडपसर व कोथरूड मतदारसंघ मागण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हडपसर मतदारसंघ सोडण्याची शक्‍यता कमी असल्यामुळे जागा वाटपात मनसेकडे कोथरूड मतदारसंघ जाऊ शकेल. तेथे आघाडीतील दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवाराची वानवा आहे. 

भाजपमध्ये काही विद्यमान आमदारांच्या जागी नवे चेहरे देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्याच पद्धतीने आघाडीतर्फेही काही ठिकाणी जुने, तर काही ठिकाणी नवे खेळाडू निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा प्रभाव टाकून गेला. काश्‍मीरमधील निर्णयाचाही फायदाही भाजपला होईल. मात्र, त्याचवेळी दक्षिण महाराष्ट्रातील पूरस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती हे मुद्देही चर्चेत राहतील. त्या भागातील अनेकजण पुण्यात स्थानिक आहेत. 

कॅन्टोन्मेंटमध्ये अटीतटीची लढत 
लोकसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात खासदार बापट यांना केवळ बारा हजार सातशे मतांची आघाडी मिळाली. तेथे भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या मतांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढ झाली. दोन्ही पक्षातील मतांमध्ये कमी फरक असल्यामुळे, आघाडीतर्फे येथे चांगली लढत दिली जाईल. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे येथून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरण्याची तयारी करीत आहेत. भाजपतर्फे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना पुन्हा संधी मिळते, की त्यांच्याजागी नवा चेहरा येणार, याबाबत चर्चा सुरू आहे. वंचित बहुमत आघाडीही या राखीव मतदारसंघात चांगली मते घेईल. 

वडगाव शेरीत चुरस 
वडगाव शेरी मतदारसंघात गेल्या निवडणुकीत जगदीश मुळीक यांनी पाच हजार मतांनी विजय मिळविताना शिवसेनेचे सुनील टिंगरे व राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना पराभूत केले होते. यावेळी टिंगरे अथवा पठारे यांच्यापैकी एकजण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मुळीक यांच्यासमोर आव्हान उभे करील. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने 56 हजार मतांची आघाडी घेतली होती. भाजपचे पारडे जड असले, तरी येथील लढतही चुरशी ठरणार आहे. 

हडपसरचे उमेदवार कोण? 
हडपसर मतदारसंघातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक योगेश ससाणे यांच्यासह काहीजण इच्छुक आहेत. अन्य पक्षांतून स्थानिक नेते राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात भाजपने प्रथमच विजय नोंदविला. निवडणुकीत माळी-मराठा समाजाच्या वर्चस्वाचा वाद या मतदारसंघात चर्चिला जातो. येथील आमदार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार, की भाजपतर्फे ओबीसी विभागाने नवीन प्रदेशाध्यक्ष विकास रासकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार, यांवर पक्षकार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला जाण्याचीही साशंकता आहे. त्यांच्यातर्फे महादेव बाबर व प्रमोद भानगिरे यांची नावे आहेत. मनसेचे नगरसेवक वसंत मोरेही तयारीला लागले आहेत. त्यामुळे, हडपसरच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीनंतरच खरे रंग भरणार आहेत. 

कसब्यात भाजप उमेदवाराबाबत उत्सुकता 
गेल्या पाच निवडणुका सलग जिंकल्यानंतर कसबा पेठचे आमदार गिरीश बापट खासदार झाल्याने, कसबा पेठेत भाजपचा उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता आहे. गेल्या पाच दशकांतील अकरा निवडणुकीत दोनवेळचा अपवाद वगळता ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. भाजपमध्ये यंदा इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. महापौर मुक्ता टिळक, गणेश बीडकर, धीरज घाटे, हेमंत रासने यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत. बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांचे नावही चर्चेत आहे. कॉंग्रेसकडून रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे इच्छुक आहेत. भाजपचा मतदारसंघावर पगडा असला, तरी विरोधक एकत्रित लढल्यास, येथे मोठे आव्हान उभारू शकतील. 

आघाडीच्या दोन्ही पक्षातील अनेकजण कॉंग्रेसमध्ये गेले असले, तरी उर्वरीत स्थानिक नेते एकत्रितरित्या चांगली लढत देऊ शकतील, अशी सध्याची स्थिती आहे. शिवसेना व मनसे यांचीही सर्व मतदारसंघात थोडीबहुत ताकद आहे. त्यामुळे, त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिकाही स्थानिक मतदारसंघातील चित्र बदलण्यास कारणीभूत ठरेल. त्यामुळे भाजपचे पुन्हा "शतप्रतिशत'चे आव्हान रोखण्याची तयारी आघाडीचे नेते करू लागले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com