Vidhansabha 2019 : बारामतीत भाजप 'संघ' यंत्रणा वापरणार 

सकाळ वृत्तसेव
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

लोकसभा निवडणुकीत बारामती काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही भाजपला त्यात अपयश आले. आता विधानसभेच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली ताकद वापरण्याची तयारी केली असून, यासाठी भाजपच्या नेत्यांसोबत मोतीबागेत बैठक झाल्याचे समजते. 

पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामती काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही भाजपला त्यात अपयश आले. आता विधानसभेच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली ताकद वापरण्याची तयारी केली असून, यासाठी भाजपच्या नेत्यांसोबत मोतीबागेत बैठक झाल्याचे समजते. 

विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील सर्व जागांवर कमळ फुलविण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. त्याचसोबत बारामतीही ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे उमेदवार महादेव जानकर यांचा थोडक्‍यात पराभव झाला. त्यामुळे 2019 मध्ये भाजपने आपली संपूर्ण ताकद बारामतीमध्ये वापरली, अनेक बड्या नेत्यांनी तेथे मुक्काम ठोकला होता, पण तरीही अपयश आले. 

सासवड येथे पुरंदर, बारामती, भोर- वेल्हा, इंदापूर, दौंड विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, गणेश भेगडे यांनी घेतल्या. तसेच या मतदारसंघातील संघटनेच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. या मुलाखतींनंतर पुण्यातील संघाचे कार्यालय असलेल्या मोतीबागेत चव्हाण आणि संघाचे महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये बारामती अणि इंदापूर येथे यंत्रणा कशी लावता येईल, उमेदवार कोण असेल यावर दोन तास खलबते झाली.
 

भाजपने जिल्ह्यातील दुसऱ्या पक्षातील मोठे नेते गळाला लावण्यासाठी प्रयत्न केले सुरू केलेले असताना आता संघाची यंत्रणा वापरून भाजपला ताकद देण्याची व्यूहरचना केली जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will use RSS for the assembly in Baramati