आठपैकी ७ जागांवर ‘कमळ’

मीनाक्षी गुरव - @GMinakshi_Sakal
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

औंध-बोपोडी या प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्षाने चारही जागा जिंकल्या, तर स्मार्ट सिटीचा प्रारंभ होणाऱ्या बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये चारपैकी तीन जागा जिंकत भाजपने विजयी घोडदौड केली. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार केवळ १२८ मतांच्या फरकाने निवडून आला.

औंध-बोपोडी या प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्षाने चारही जागा जिंकल्या, तर स्मार्ट सिटीचा प्रारंभ होणाऱ्या बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये चारपैकी तीन जागा जिंकत भाजपने विजयी घोडदौड केली. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार केवळ १२८ मतांच्या फरकाने निवडून आला.

काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच औंध-बोपोडीत थोपविण्यात भाजपला यश आले. या प्रभागात गट अमध्ये भाजपच्या (आरपीआय) सुनीता वाडेकर या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. वाडेकर १७ हजार ०९२ मतांनी, तर गट ब मध्ये भाजपच्या अर्चना मुसळे १४ हजार ३८९ मतांनी विजयी झाल्या. गट बमध्ये सुरवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या संगीता गायकवाड आघाडीवर होत्या; मात्र तिसऱ्या फेरीनंतर मुसळे यांनी मुसंडी मारली. यात गायकवाड यांना १० हजार ६७१ हजार मते मिळाली. 

गट कमध्ये काँग्रेसचे आनंद छाजेड आणि राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील यांची आघाडी होती. ही आघाडी पहिल्या दोन-तीन फेऱ्यांपर्यंत कायम होती; मात्र त्यानंतर चित्र बदलत गेले आणि भाजपचे विजय शेवाळे यांचे मतांचे पारडे जड झाले. शेवाळे यांना १३ हजार ४८६ मते मिळाली. शेवाळे यांनी छाजेड (१० हजार ८८२) आणि पाटील (१० हजार १०३) यांचा पराभव केला. गट डमध्ये भाजपचे बंडू ऊर्फ प्रकाश ढोरे यांनी सुरवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती. राष्ट्रवादीच्या अशोक मुरकुटे (९ हजार १५४) आणि काँग्रेसचे कैलास गायकवाड (७ हजार ९१३) यांना मागे टाकत ढोरे विजयी झाले. त्यांना १६ हजार ६३२ मते मिळाली. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा पारंपरिक मतदार असणाऱ्या या प्रभागातील मतदारांनी या वेळी ‘भाजप’ला साथ दिल्याचे पाहायला मिळाले. बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांमध्ये शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळाली. गट अमध्ये राष्ट्रवादीच्या विद्या बालवडकर सुरवातीपासून आघाडीवर होत्या; मात्र तिसऱ्या फेरीनंतर भाजपच्या स्वप्नाली सायकर यांनी आघाडी घेतली. सायकर यांनी २० हजार ५८ मते मिळवत बालवडकर यांचा पराभव केला. बालवडकर यांना १९ हजार ८२० मते मिळाली. या दोघींच्या मतांमध्ये केवळ २३८ मतांचा फरक होता. गट बमध्ये भाजपच्या ज्योती कळमकर यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. कळमकर यांनी राष्ट्रवादीच्या नीलिमा सुतार (१३ हजार १४५) आणि मनसेच्या बेबीताई निम्हण (६ हजार ३२८) यांचा पराभव केला. कळमकर यांना २० हजार १३७ मते मिळाली. गट कमध्ये भाजपचे अमोल बालवडकर हे सुरवातीपासूनच आघाडीवर होते. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमोद निम्हण (१७ हजार ३१६) यांचा पराभव केला. त्यांना २५ हजार ९३४ मते मिळाली. 
 

१२८ मतांच्या फरकाने चांदेरे विजयी 
शहरातील लक्षवेधी ठरणाऱ्या प्रभाग क्रमांक ९ मधील गट ड मधील उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण हे याच प्रभागात राहत असल्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चुरस होईल, असे अपेक्षित होते; परंतु सुरवातीपासूनच राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे आणि भाजपचे राहुल कोकाटे यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासूनच या दोघांनी शिवसेनेचे चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण यांना मागे टाकले. सुरवातीला चांदेरे हे आघाडीवर होते; मात्र कोकाटे यांनी पाचव्या फेरीपासून चांगलीच आघाडी घेतल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. सरते शेवटी केवळ १२८ मतांच्या फरकाने चांदेरे विजयी झाले. चांदेरे यांना २१ हजार ३९६ मते मिळाली. चांदेरे आणि कोकाटे (२१ हजार २६८) यांच्यात अटीतटीची लढत झाली. सनी निम्हण यांना सात हजार ६५६ मते मिळाली.

Web Title: bjp win in aundh-bopodi field