भाजपमध्ये ‘थोडी खुशी, थोडा गम’ | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

पुण्यातील आठही मतदारसंघांतील निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील मुख्यालयाबाहेर पक्षाने पोस्टर लावले. ‘जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो’ असा उल्लेख त्यावर करीत जनतेचे आभार मानले.

पुणे - पुण्यातील आठ मतदारसंघांतील अटीतटीच्या लढतींमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले. मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर सहा मतदारसंघांतील सामन्यात जोरदार चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे प्रत्येक लढतीकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले. कुणी मोबाईल, तर कुणी टीव्हीसमोर बसून हे राजकीय सामने पाहिले. शहरातील भाजपच्या विजयाचा वारू रोखत राष्ट्रवादीने आठपैकी दोन जागा मिळविल्या. त्यामुळे सहा जागा आल्याने भाजपच्या मुख्यालयात गुलाल उधळला गेला; पण दोन जागा गमाविल्याची निराशाही तेथे होती.

पुण्यातील आठही मतदारसंघांतील निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील मुख्यालयाबाहेर पक्षाने पोस्टर लावले. ‘जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो’ असा उल्लेख त्यावर करीत जनतेचे आभार मानले. सहा जागा मिळाल्याबद्दल पक्षाने गुलालाची उधळण केली. मुख्यालयाबाहेर शिवाजी महाराज आणि भारतमातेच्या प्रतिमा ठेवून त्यांचे पूजन करण्यात आले. सकाळपासून खासदार गिरीश बापट हे मुख्यालयात बसून होते. पुण्यातील चुरशीच्या लढतीचे चित्र ते दूरचित्रवाहिनीवरूनही पाहत होते.

भाजप मुख्यालयात विजय साजरा केला असला, तरी त्यात जोश नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीत आठही मतदारसंघांत त्यांना विजय मिळाला. परंतु, या वेळी दोन जागा गमवाव्या लागल्याची खंतही कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. काँग्रेस भवनमध्ये मात्र किरकोळ कार्यकर्ते वगळता अन्य कुणीही तेथे नव्हते. काँग्रेसच्या उमेदवारांनी शिवाजीनगर आणि पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघ या दोन ठिकाणी चुरशीची लढत दिली. पण, त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या पक्षातही निराशा दिसून येत होती. हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी या भागांमध्ये जल्लोष केला.

गुलालाची मुक्तहस्ते उधळण
पुण्यातील सर्व निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी फेरी काढली. उमेदवार मतदारांपुढे हात जोडत होते. या वेळी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळणही करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे रस्त्यावरील गर्दीदेखील कमी होती. चौकाचौकांत निकालाविषयी आणि विविध पक्षांच्या कामगिरीच्या चर्चा, विश्‍लेषणांचे फड रंगले होते. अनेकांनी मोबाईलवरून प्रसारमाध्यमांच्या संकेतस्थळांचा आधार घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP won six seats in Pune

Tags
टॉपिकस