आळंदी, जेजुरीसह पुणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी भाजपचा घंटानाद

jejur
jejur

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मंदिरे देवदर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. लॉकडाउननंतर सध्या अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात मंदिरांमध्ये भाविकांना देवदर्शन व धार्मिक विधी करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात भाजपच्या वतीने ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.  

जेजुरीत आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा 
जेजुरी :
जेजुरी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष सचिन पेशवे, राहुल शेवाळे, स्नेहल दगडे, अलका शिंदे, सुनीता कसबे, ऋतुजा जाधव, गणेश भोसले, शकील जगताप, सचिन लंबाते, प्रसाद अत्रे, तुकाराम यादव आदी उपस्थित होते. शिवाजी चौकातून हे आंदोलन सुरू झाले. नंदीचौकामध्ये त्याची सांगता झाली. धार्मिक स्थळे खुली न झाल्यास करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 

आळंदीत जिल्ह्याध्यक्षांची उपस्थिती
आळंदी :
मंदिर सुरू करण्यासाठी दार उघड उद्धवा दार उघड म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरासमोर घंटानाद केला. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपची अध्यात्मिक समन्वय आघाडीचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, गुलाब खांडेभराड, संजय घुंडरे, पांडुरंग वहीले, पांडुरंग ठाकुर, पांडुरंग शितोळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.  

हर्षवर्धन पाटील यांचा सरकारला इशारा                                                नीरा नरसिंहपूर : राज्यात आंतरजिल्हा बंदी उठवून सार्वजनिक वाहतूक सुरू केली, मात्र प्रार्थनास्थळांवरील बंदी कायम ठेवली आहे. सरकारने मंदिराची दारे उघडून लोकांची श्रद्धास्थाने दर्शनासाठी खुली करावीत. अन्यथा, शासनास मंदिरे उघडण्यास भाग पाडू, असा इशारा भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला. नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे भाजपच्यावतीने श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या बाहेर पश्चिम दरवाजा समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. या वेळी तालुकाध्यक्ष शरद जमदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, अकलूज कारखान्याचे संचालक महादेव घाडगे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, माजी सरपंच हनुमंत काळे, संतोष मोरे, विलास ताटे, हरिदास घोगरे, आनंद काकडे, अंकुश रणखांबे, पोलिस पाटील अभय वांकर आदी उपस्थित होते. 

मुळशीतील विठ्ठलवाडीत आंदोलन
पौड :
राज्य सरकारच्या विरोधात मुळशी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे विठ्ठल मंदिरापुढे घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दार उघडा, उद्धव ठाकरे दार उघडा, अशा घोषणा दिल्या. या वेळी मुळशी तालुका भाजपचे अध्यक्ष अॅड. विनायक ठोंबरे, मुळशी तालुका भाजप संपर्कप्रमुख बाळासाहेब कुरपे पाटील, भाजप सांस्कृतिक अघाडीचे सुरेश ठोंबरे, दत्ता कुरपे, माजी सरपंच विष्णूपंत नाकते आदी उपस्थित होते. 
 

रूई येथे बाबीर मंदिरासमोर आंदोलन 
कळस :
भाजप युवा मोर्चाच्या वतीने रुई येथील बाबीर मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते माउली चवरे, युवा मोर्चाचे सचिव आकाश कांबळे, आबासाहेब थोरात, दीपक साळुंके, तानाजी मारकड, बापूराव लावंड, विश्‍वजित ठोंबरे, बाळासाहेब कांबळे, सिद्धार्थ घोडके, रामा पांढरमिसे, अविनाथ पाळेकर आदी या वेळी उपस्थितीत होते. 

दौंड तालुक्यात राज्य सरकारवर टीका  
केडगाव :
चौफुला (ता. दौंड) येथील बोरमलनाथ मंदिरात भाजप व देवस्थानच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर म्हणाले, ""केंद्र सरकारने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. परंतु राज्य सरकार मंदिरे सुरू करण्याबाबत चालढकल करत आहे.'' तालुकाध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे म्हणाले, ""देवस्थाने सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर "दार उघड उद्धवा, दार उघड', अशी हाक देत भाजपकडून घंटानाद आंदोलन होत आहे. सरकारने त्वरित मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा.'' भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, गणेश आखाडे, ज्ञानदेव शेळके, दादासाहेब केसकर, मल्हारी गडधे, अप्पासाहेब हंडाळ, अशोक हंडाळ, कैलास पुजारी,सरपंच अजित शेलार, सोमनाथ गडधे, नितीन जगताप आदी उपस्थित होते. 

बनेश्वर मंदिरासमोर घंटनाद 
नसरापूर  :
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी ती पुन्हा खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने नसरापूर येथील बनेश्वर मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. या वेळी भाजपचे भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, माजी अध्यक्ष गणेश निगडे, विश्वास ननावरे, ऍड. अनिल कदम, डॉक्‍टर सेलचे अध्यक्ष डॉ. श्याम दलाल, कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, सुधीर शेडगे, अशोक पांगारे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर बुदगुडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कोंडे म्हणाले, ""सरकारला दारू दुकाने चालली पाहिजे; मात्र, मंदिरे बंद हवी आहेत. यामुळे लहान, मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत त्वरित विचार करून सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करावीत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com