अवघ्या ३० सेकंदांत रक्तगट कळणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करून तयार केलेले रक्तगट सांगणारे उपकरण.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करून तयार केलेले रक्तगट सांगणारे उपकरण.

पुणे - अवघ्या तीस सेकंदांमध्ये आणि तीन रुपयांत रक्तगट सांगणारे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले आहे. त्याचे प्राथमिक उपकरणही तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भाग आणि संकटकाळात जखमींना तातडीने रक्ताचा पुरवठा होण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. सद्यःस्थितीत रक्तगट शोधायचा असेल, तर पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त पाठवावे लागते. त्यानंतर तासाभराने रक्तगट समजतो. परंतु विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अरुण बनपूरकर, पीएचडीचे विद्यार्थी संदीप वाढाई आणि अनुराग कणसे यांनी संशोधन करून दोन- तीन रुपये एवढ्या अत्यल्प दरात उपलब्ध होईल असे रक्तगट सांगणारे उपकरण तयार केले आहे. यामुळे रक्ताच्या एका थेंबात अवघ्या तीस सेकंदात रक्तगट समजू शकणार आहे.

संशोधनाबाबत ‘सकाळ’शी बोलताना वाढाई म्हणाले, ‘‘आपत्कालीन स्थितीत बऱ्याचदा रुग्णाला तातडीने रक्ताची गरज लागते. अशावेळी त्याचा रक्तगट माहिती असतोच असे नाही. त्याचा रक्तगट क्षणार्धात समजला, तर तातडीने रक्त देऊन त्याचे प्राणही वाचविता येतील. या विचाराने आम्ही केलेल्या संशोधनाला यश मिळाले आहे.’’

सध्या उत्पादनपूर्व चाचण्या सुरू आहेत. त्याची सांख्यिकी माहिती जमा करून त्याला अंतिम रूप दिले जाईल. या उपकरणाकडून अचूक परिणामासाठी या चाचण्या महत्त्वाच्या आहेत. विद्यापीठाच्या नवसंशोधन, उद्योजकता विकास विभागाकडे स्टार्टअप सुरू करण्यासाठी नोंदणी केली आहे. आम्ही या संशोधनाचे आधी उत्पादन करणार असून, त्यानंतर त्याचे पेटंट मिळविण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत. उपकरण निर्मितीचा खर्च केवळ तीन ते चार रुपये आहे.’’ 

उत्पादनासाठी विद्यापीठाची मदत
विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ‘‘विद्यापीठात चालणारे संशोधन सामान्य लोकांच्या उपयोगासाठी वापरले जावे, असे धोरण आहे. त्यादृष्टीने हे संशोधन उत्पादनाच्या रूपात बाजारात आणण्यासाठी मदत केली जाणार आहे. आयआयटीच्या धर्तीवर ही संकल्पना विद्यापीठात राबविली जात आहे. यासारखे उपयोजित असणाऱ्या संशोधनांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com