जम्मू-काश्मीरवरून आलेल्या 'त्या' पार्सलने उडाला पोलिसांचा गोंधळ!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

बीडीडीएस पथकाने संबंधित पार्सल सुरक्षितरित्या रमणबाग मैदानावर नेले. पोलिसांनी बॉम्बसूट घालून तपासणी केली.

पुणे : जम्मू-काश्मीर येथून श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यास सोमवारी (ता.३) कुरिअरद्वारे आलेले पार्सल बॉम्बसदृश्य वाटल्याने पोलिस यंत्रणेचा चांगलाच गोंधळ उडाला. मात्र बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) संबंधीत वस्तूची तपासणी केल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा श्रीगणेशा; १७ दिवसांत होणार हॉस्पिटलची उभारणी!​

दगडूशेठ मंदिराचे पदाधिकारी महेश सूर्यवंशी यांच्या घरी सोमवारी एका कुरिअर कंपनीकडून पार्सल आले होते. या पार्सलवर जम्मू-काश्मीर येथील पत्ता होता, त्यावरील नाव देखील अनोळखी होते. त्यामुळे त्याबद्दल संशय वाढल्याने त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच बीडीडीएस पथक दाखल झाले. त्यांनी संबंधित पार्सल सुरक्षितरित्या रमणबाग मैदानावर नेले. पोलिसांनी बॉम्बसूट घालून तपासणी केली. त्यावेळी स्फोटके नसल्याचे दिसून आल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला.

पिस्तुलाचा धाक दाखवत महिलेला जीवे मारण्याची दिली धमकी; जगताप, बऱ्हाटेविरुद्ध पाचवा गुन्हा दाखल!​

सूर्यंवशी यांनी काही दिवसांपूर्वी गणेश मूर्ती मराठा बटालियनला पाठविली होती. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून सुभेदार महादेव पवार यांनी जम्मू-काश्मीर येथील दुकानदाराला सूर्यवंशी यांना ड्रायफ्रूट पाठविण्यास सांगितले. मात्र संबंधित दुकानदाराने पवार यांच्या नावाऐवजी स्वतःच्या नावाने पार्सल पाठवल्याने सगळा गोंधळ उडाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bomb-like parcel from Jammu and Kashmir had frightened the police