β ...आणि मग एक दिवस (नसीरुद्दीन शाह)

शलाका विचारे
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

खरंखुरं आत्मचरित्र लिहिणे म्हणजे जवळ जवळ ‘कन्फेशन‘ करण्यासारखेच असते. असे आत्मचरित्र लिहिण्यासाठी बेधडक वृत्ती लागते. लोक काय म्हणतील याचा विचार मनात आला, की कथनात डावे-उजवे आलेच म्हणून समजावे. पण काही ‘चरित्रनायकां‘कडे असे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असते. त्यांचे आत्मचरित्र हा एक प्रकारे आरसाच असतो. जे आहे तेच स्वच्छपणे दाखवणार. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे ‘आणि मग एक दिवस...‘ हे आत्मचरित्र यात चपखल बसणारे आहे. एका सक्षम अभिनेत्याच्या कसदार आत्मकथनाचा अनुवाद तितक्‍याच सक्षम लेखिकेने केला आहे- सई परांजपे यांनी. पॉप्युलर प्रकाशनने त्याची निर्मिती केली आहे. 

खरंखुरं आत्मचरित्र लिहिणे म्हणजे जवळ जवळ ‘कन्फेशन‘ करण्यासारखेच असते. असे आत्मचरित्र लिहिण्यासाठी बेधडक वृत्ती लागते. लोक काय म्हणतील याचा विचार मनात आला, की कथनात डावे-उजवे आलेच म्हणून समजावे. पण काही ‘चरित्रनायकां‘कडे असे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असते. त्यांचे आत्मचरित्र हा एक प्रकारे आरसाच असतो. जे आहे तेच स्वच्छपणे दाखवणार. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे ‘आणि मग एक दिवस...‘ हे आत्मचरित्र यात चपखल बसणारे आहे. एका सक्षम अभिनेत्याच्या कसदार आत्मकथनाचा अनुवाद तितक्‍याच सक्षम लेखिकेने केला आहे- सई परांजपे यांनी. पॉप्युलर प्रकाशनने त्याची निर्मिती केली आहे. 

मस्त कलंदर नसीरुद्दीन यांचे बालपणही चित्रपटाची कथा ठरावी असेच आहे. लखनौजवळच्या बाराबंकी नावाच्या तेव्हाच्या एका छोट्या खेड्यातील घरंदाज घराण्यात त्यांचा जन्म झाला, पण जन्मतारीख कुणालाच माहीत नाही. आईच्या म्हणण्याप्रमाणे रमझानमध्ये त्यांचा जन्म झाला. जन्मतारीख अनिश्‍चित तसेच त्यांचे बालपणही बेभरवशाचे होते. अभ्यासात एकेका पायरीने खाली उतरत नापास होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. पण नैनितालला ‘सेम‘ (सेमिनरीचा लघु उच्चार) मध्ये असताना दरवर्षी एकापेक्षा एक बहारदार इंग्रजी चित्रपट त्यांना पाहता आले. त्यांना शाळा सुटल्याची खंत म्हणजे आता चित्रपट पाहता येणार नाहीत, ही होती. स्वप्नरंजन हा त्यांचा मोठा छंद. आपलीच भूमिका आपणच स्वच्छंदपणे त्यांनी रंगविल्या होत्या. पण प्रत्यक्षात जगताना मात्र वेगळेच अनुभव आहेत. त्यांच्या अशा या स्वच्छंदी स्वभावामुळे वडिलांशी त्यांचे (सु)संवाद कमी होत होते. त्याची उणीव अर्थात अम्मी भरून काढत होती. 

अशा या नसीरला वयाच्या दुसऱ्या वर्षीच अजाणत्या वयात अभिनयाने भुरळ घातली. तो कोणाचा आणि कसला अभिनय होता, हे समजण्याचे ते वयच नव्हते. पण स्वप्न रंगवण्याची सवय तेव्हापासूनच लागली. स्वतःला वेगवेगळ्या भूमिकांतील नायक कल्पून आपलाच सिनेमा आपणच बघायची ती सवय. त्या चित्रपटांचा दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माताही तेच. बरं, भूमिका कोणत्या तर कधी गुप्तहेर, कधी मासेमार, कधी चक्क दर्यावरचा चाचा, कधी शिकारी (शिकारीचा छंद त्यांना बालपणापासून होताच.) या एकपात्री चित्रकथेत ते तासन तास रंगून जात. त्यामुळे अभ्यासाचा बोजवारा उडाला. पण त्याची फिकीर नव्हती. अशा या मस्तमौला नसीरचे वडील अजमेरच्या सुप्रसिद्ध दर्ग्याचे अधिकारी होते. पण नसीर यांना अजमेरचा सहवास वर्षातील एखादा महिनाच लाभे. त्यांचे हे आत्मकथन वाचताना क्‍लिष्ट शब्दांची आणि वाक्‍यांची पेरणी झाली आहे, त्यावरूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज यावा. बालपणी वर उल्लेखिलेल्या स्वनिर्मित चित्रपटांत जरी नासीर काम करीत असले, तरी त्यांची एक ठाम धारणा लहानपणापासून होती ती म्हणजे दुनियेत जी काही जादू घडते, ती रंगमंचावरच घडू शकते. चित्रपट तुम्हाला बांधील करतो. 

अशा या नसीर यांचे पहिले मुंबई दर्शन घरातून पळून जाऊन झालं. अर्थात चित्रपटात काम करण्यासाठीच. कॉलेजच्या फीचा वापर डेहराडूनहून मुंबईला येणाऱ्या रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी झाला. मुंबईला आल्यावर काही गणितं अधिकच क्‍लिष्ट झाली. वांद्य्राच्या पाली हिलवरून सुरुवातीला रवानगी झाली लिंकिंग रोडवर बेकार नटमंडळींचा अड्डा असलेल्या पॅंपॉश रेस्ट्रॉंमध्ये. तिथून तर नंतर थेट मदनपुऱ्यात. मदनपुऱ्यातून योगायोगाने दिलीपकुमार यांच्या बंगल्यात. त्यांनीच तरुण नसीर यांना सल्ला दिला, की तू या क्षेत्रात येऊ नकोस. ज्या अजमेरच्या दर्ग्यात नसीर यांचे वडील अधिकारी होते, त्या दर्ग्यावर आणि तिथल्या बाबांवर दिलीपकुमार यांची अपार श्रद्धा. त्या नात्यापोटीच वाया जाऊ पाहणाऱ्या या युवकाला त्यांनी चित्रपट क्षेत्रात न येण्याचा सल्ला दिला होता. 

(नंतर या दोघांनी एकत्र काम केले तो भाग निराळा.) दिलीपकुमार यांच्या बंगल्यातून नसीरची थेट रवानगी त्यांच्या घरी झाली. पण या मुंबईच्या वास्तवात नसीर यांनी जीवाची मुंबई करून घेतली. मदनपुऱ्यापासून कामाठीपुरा जवळच होता. अधूनमधून तिथेही त्यांच्या फेऱ्या व्हायच्या, हे त्यांनी आत्मकथनात प्रांजळपणे कबूल केले आहे. त्यांनी लिहिताना कोणताच आडपडदा ठेवलेला नाही, हे वर आलेच आहे. त्याचे हे उदाहरण. याच वास्तवात एक्‍स्ट्रॉच्या एक-दोन भूमिका नसीर यांना मिळाल्या. पण चित्रपटात त्यांना स्वतःलाच शोधूनही हुडकून काढता आले नाही. तरीही त्यांना एक चांगला धडा मिळाला. ते म्हणतात, ‘एका दिवसाच्या कामासाठी आम्हाला 7.50 रुपये कबूल करण्यात आले. वाजवी दर होता 15 रुपये. पण आम्ही युनियनचे सभासद नव्हतो. तेव्हा आमची निम्मी मिळकत हा भाडखाऊ खाणार होता.... त्या वेळेला नेमकं काय षड्‌यंत्र चालू होतं याचा थांग लागायला मला तब्बल पस्तीस वर्षे चित्रपटसृष्टीची आतडी पिंजून काढायला लागली.‘ 

नसीरुद्दीन यांची यानंतरची कलाक्षेत्रातील कारकीर्द कशी घडत गेली, पंधरा वर्षांचा असताना शायलॉक आणि लियरच्या हुकमी भूमिका कशा केल्या, अल्काझींशी त्यांची भेट, एनएफडीतील प्रवेश, परत मुंबईत. पं. सत्यदेव दुबेंशी झालेली प्रथम भेट वगैरे तपशिलात जाण्याची गरज नाही. पण उत्तम अभिनेता बनण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत अफलातून आहे. सांसारिक जीवनात जे प्रमाद घडले, तेही ते प्रांजळपणे कथन करतात. आतून-बाहेरून ते कसे आहेत, हे मात्र सहजपणे तेच स्वतः उलगडून दाखवतात. त्यांनी लिखाणात कुठेही आडपडदा ठेवलेला नाही. त्यांनी जाणतेपणी केलेल्या चुकांचे समर्थन करण्याचा ते प्रयत्न करीत नाहीत; पण लपवूनही ठेवत नाहीत. आपला आदर्श कुणी घ्यावा, आपल्या मुलांनीही घ्यावा, असे त्यांना वाटत नाही. त्यांचे हे लिखाण स्वान्त सुखाय आहे. मनातलं बाहेर काढण्यासाठी आहे. त्यांच्या आठवणी रम्य आहेत, बेधडक आहेत म्हणून त्या वाचकाला भावतात. 

जसे त्यांचे ‘ऍण्ड देन वन डे‘ हे मूळ इंग्रजी आत्मकथन आहे, तसेच ते मराठीत वाचकांपुढे ठेवण्याचे कसब सई परांपजे यांनी केले आहे. त्यांनीही अनुवादात कुठे आडपडदा ठेवला नाही. भाषेची लज्जत त्यांनी वाढवली आहे. काही वाक्‍ये चित्रपटातील संवादासारखी पल्लेदार आहेत. मराठीतही ती तशीच पल्लेदार ठेवण्याची किमया अनुवादिकेने केली आहेत. त्यांनी आपली कामगिरी अगदी व्यवस्थित निभावली आहे. त्यांचेही अर्थातच अभिनंदन. 

पुस्तकाचे नाव - आणि मग एक दिवस 

  • लेखक - नसीरुद्दीन शाह 
  • अनुवाद - सई परांजपे 
  • प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन 
  • पृष्ठे - 290 (मोठा आकार) 
  • किंमत - 650 रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: book review : autobiography of Nasiruddin Shah