राष्ट्रीय संचलनात पिंपरी-चिंचवड शहरातील दोघे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

गर्वाची बाब
राजपथावर संचलन करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. निवड झाल्याचे शिक्षकांकडून कळल्यावर रडूच कोसळले होते. आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रजासत्ताकदिनी उत्तमप्रकारे संचलन करण्यासाठी खूप सराव केल्याची माहिती अमोल साबळे याने दिली.

पिंपरी - प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीमध्ये राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी शहरातून राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील कॅडेट सिद्धोधन साबळे आणि अमोल साबळे हे ते विद्यार्थी आहेत. त्यामुळे शहराचे नाव उंचावले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांगवीतील या महाविद्यालयात एनसीसी युनिट कार्यरत आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राष्ट्रीय संचलनासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी नुकतेच पुणे येथे कॅम्प झाला. यामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांतून जवळपास दहा हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातून ११६ कॅडेटची या संचलनासाठी निवड झाली. त्यात पुणे ग्रुपमधून ३९ कॅडेट, तर २ महाराष्ट्र बटालियनच्या ११ कॅडेटची निवड झाली. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई ‘अ’, मुंबई ‘ब’ आणि पुणे यांचा समावेश होता. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांनी दहा दिवसांचे एक शिबिर अशी दहा शिबिरे पूर्ण केली. या कॅम्पमधील खडतर सरावानंतर त्यांची निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी दिली. महाराष्ट्र बटालियनचे कर्नल एमपीएस मौर्य व एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट व्ही. ए. नाईकवाडी यांनी कॅडेट सिद्धोधन साबळे व अमोल साबळे यांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय संचलनासाठी महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांची प्रथमच निवड झाली आहे. ही निवड अभिमानास्पद बाब असल्याची भावना घोरपडे यांनी व्यक्त केली. ‘‘राजपथावर प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय संचलनात संधी मिळणे हे माझ्यासह कुटुंबीयांसाठी गौरवाची बाब आहे. या भावनेने माझ्यामध्ये उत्साह संचारला आहे,’’ असे सिद्धोधन साबळे याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both in the city of Pimpri Chinchwad in the national movement