कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राच्या दोन्ही उड्डाण चाचण्या यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

missile

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) नुकतेच घेतलेल्या कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली (व्हीएसएचओआरएडीएस) क्षेपणास्त्राच्या दोन्ही उड्डाण चाचण्या यशस्वी झाल्या.

कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राच्या दोन्ही उड्डाण चाचण्या यशस्वी

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) नुकतेच घेतलेल्या कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली (व्हीएसएचओआरएडीएस) क्षेपणास्त्राच्या दोन्ही उड्डाण चाचण्या यशस्वी झाल्या. ओडिशाच्या चांदीपूर एकात्मिक चाचणी केंद्र येथे मंगळवारी (ता. २७) ही चाचणी पार पडली.

व्हीएसएचओआरएडीएस ही 'मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम' (मॅनपॅड) एक स्वदेशी प्रणाली आहे. हैद्राबाद येथील डीआरडीओच्या रिसर्च सेंटर इमरतद्वारे (आरसीआय), डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा व उद्योग भागीदारांच्या सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत ही आणखीन एक यशस्वी वाटचाल ठरली आहे.

या यशसवी चाचण्यांसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि उद्योग भागीदारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या नवीन क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलाच्या क्षमता वाढेल, असे ही त्यांनी नमूद केले.

व्हीएसएचओआरएडीएस क्षेपणास्त्रामध्ये सूक्ष्म अभिक्रिया नियंत्रण प्रणाली (आरसीएस) आणि एकात्मिक विमानशास्त्रासह अनेक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे क्षेपणास्त्र, कमी उंचीवरील हवाई धोक्यांना कमी पल्ल्यावर नष्ट करण्यासाठी 'ड्युअल थ्रस्ट सॉलिड मोटर'द्वारे प्रक्षेपित केले जाते. दरम्यान दोन्ही उड्डाण चाचण्यांनी मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण केली आहेत.