फेसबुक फ्रेंडशीप बेतली जीवावर; पुन्हा भेटण्यास नकार दिल्याने तरुणीवर केले चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

मित्राने चाकूने वार केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीचा सोमवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या मित्राविरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल झाला असून सिंहगड पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुणे : मित्राने चाकूने वार केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीचा सोमवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या मित्राविरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल झाला असून सिंहगड पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

प्रियंका वसंत अरेनावरू (वय.२१ ,रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बसवराज सिद्धप्पा हिळी (वय २६, रा. गुरूदेवदत्त इमारत नर्‍हे) यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज आणि प्रियंका मुळचे सोलापूरचे असून, दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. फेसबुकच्या माध्यामातून त्यांची ओळख  झाली होती.  बसवराज संगणक अभियंता असून तो नर्‍हे भागात वास्तव्यास आहे. तर प्रियंका सोलापूरमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

काल ती प्रात्यक्षिक परिक्षा देण्यासाठी पुण्यात आली होती. प्रियंका आणि तिची आई बिबवेवाडीतील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले होते. काल दुपारी प्रियंका नर्‍हेत वास्तव्यास असलेला मित्र बसवराजला भेटण्यासाठी गेली होती. ''घरातील लोक विरोध करीत असल्याचे सांगून मी तुला पुन्हा भेटणार नाही'', असे प्रियांकाने बसवराजला सांगताच त्याने बॅगमध्ये आणलेल्या चाकूने तिच्या छातीवर, पाठीवर वार केले. त्यानंतर तो पळून गेला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी जखमी प्रियांकाला उपचारासाठी ससूनला दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरु असतानाच काल सकाळी साडेअकराच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy attack on Girl due to refuse to meet in pune