रहिमतपूर,ब्रह्मपुरी येथे ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत खाद्यजत्रा उत्साहात
ब्रह्मपुरीतील आश्रमशाळेत खाद्यजत्रा उत्साहात
रहिमतपूर, ता. ५ : ब्रह्मपुरी येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी खाद्यजत्रेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची जाणीव, कष्टाची सवय आणि ‘स्वतः करून शिकणे’ ही वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या खाद्यजत्रेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि परस्पर सहकार्याने विविध खाद्यपदार्थ तयार केले. खीर, शुद्ध शाकाहारी जेवण, भजी, वडापाव, भाकरी-भाजी, पाणीपुरी, भेळ, पॅटीस यांसारख्या चविष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. प्रत्येक गटाने आपल्या खाद्यपदार्थाचे नियोजन करून आवश्यक साहित्य जमा केले, पूर्वतयारी केली तसेच भाजी चिरणे, स्वच्छता राखणे आणि स्वयंपाकात मदत करणे अशा सर्व कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
आपला पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य गोळा करणे, त्याचे योग्य नियोजन करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना विशेष आनंद मिळाला. स्वयंपाक करताना आणि पदार्थ सादर करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व समाधान स्पष्टपणे दिसत होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, जबाबदारीची जाणीव आणि व्यवहारज्ञान वाढीस लागले. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सूचनांमुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
B01638
रहिमतपूर ः आश्रमशाळेत ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत खाद्यजत्रेत सहभागी शिक्षक व विद्यार्थी.

