पुण्याची वैभवशाली बाजारपेठ

pune
pune

एकेका ठिकाणाचं खरंच वैशिष्ट्य असतं. ते लपलेले असतं. खोलात शिरून त्याचे पदर उघडून दाखविल्याशिवाय त्यातली कोडी सुटतच नाहीत. पुण्याच्या बाजारपेठेचंही अगदी तसंच आहे. कोणत्याही शहराच्या भरभराटीला तिथला व्यापार आणि उलाढाल हेच दोन घटक कारणीभूत असतात. पुणे या नियमाला अपवाद राहिलेले नाही. माहिती तंत्रज्ञानाचे गोडवे गात पुण्याची महती सांगताना बाजारपेठेचा इतिहास विसरून चालणार नाही; कारण आजच्या विकासात याच बाजारपेठांचा सहभाग मोठा आहे.


बाजारपेठ पुण्याची... अगदी जरी-रेशमापासून काबूल-कंदाहारच्या सुकामेव्यापर्यत, पैठणीपासून ठुशीच्या दागिन्यांपर्यंत अशा किती तरी वस्तूंचा व्यापार या बाजारपेठेत चालला आणि अव्याहतपणे चालतही आहे. पुण्याच्या इतिहासाच्या नोंदी लिहिताना संशोधकांनी, इतिहासकारांनी या बाजारपेठेच्या परंपरेचं भरभरून कौतुक केलंय.
पुण्यातील बाजारपेठ नेमकी कधी सुरू झाली, याविषयी अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. कसबा पेठ हेच पुण्यातलं केंद्रस्थान होतं आणि त्याभोवती रविवार, बुधवार, गुरुवार पेठा अशा बाजारपेठा विकसित झाल्या. पुण्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये भवानी पेठेचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. पुण्यात अगदी सर्वप्रथम बाजारपेठ वसली ती भवानी पेठ. अत्यंत मोक्‍याची जागा आणि सात वर्षांची करमाफी यामुळे अल्पावधीतच भवानी पेठेत व्यापाऱ्यांनी आपलं बस्तान बसविलं. जुन्या नोंदीनुसार भवानी पेठेचा विस्तार आत्ताच्या गणेश पेठ, रविवार पेठ आणि महात्मा फुले पेठेपर्यंत होता. 


‘भवानी’नंतर रविवार पेठेतील सराफ कट्ट्याचा आणि त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या कापड बाजाराचा क्रमांक येतो. वैभवशाली इतिहास असलेल्या या बाजारपेठेनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र आपली क्षितिजं विकसित केली आहेत. विशेषतः पानशेतच्या पुरानंतर या बाजारपेठेचा चेहरामोहराच पुरता बदलून गेला. एके काळी भवानी पेठेत बैलांच्या चारशे-पाचशे छकड्यांवरून चालणाऱ्या नानाविध वस्तूंच्या बाजारात आता दोन बाय दोन फुटांच्या टेबलावरून ‘ऑन लाइन ट्रेडिंग’ या नव्या पद्धतीनुसार दिवसागणिक कोट्यवधी रुपयांचा व्यापार चालतो. जिकडे बघावे तिकडं संगणकांवर रोखलेली बारीक नजर आणि दूरध्वनींचा खणखणाट याच्या पलीकडे कोणतंच चित्र दिसत नाही. प्रत्येक सणाला आणि दसरा-दिवाळीला विशेष खुलणाऱ्या या बाजारपेठेत आता जगातली प्रत्येक वस्तू हजर आहे. काळाच्या ओघात या बाजारपेठेनं कात टाकली आहे. मंडई असो की नाना पेठ-भवानी पेठ, लक्ष्मी रस्ता असो की जुना बाजार, सगळीकडे बदलत्या काळाच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. आता तर भव्यदिव्य ‘शॉपिंग मॉल’नं या बाजारपेठा कधीच आपल्या विळख्यात घेतल्या  आहेत, तरी देखील... पुण्याच्या बाजारपेठेची परंपरा कायम राहण्यासाठी ब्रँडस् ऑफ पुण्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या उद्योग समूहाची, व्यवसायाची माहिती दिली जात आहे. सध्या कोरोनाच्या साथीमुळे सर्वसामान्यांपर्यंत आपल्या उत्पादनाची माहिती पोचणे गरजेचे आहे. आमचाही तोच प्रयत्न असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com