Video : ट्रक आणि बसचालक महिलेचा धाडसी जीवनप्रवास

ट्रक चालविताना अश्विनी भुस्कुटे.
ट्रक चालविताना अश्विनी भुस्कुटे.
Updated on

अश्विनी अशोक भुस्कुटे अगदी सफाईने ट्रक आणि बस चालवतात, हे पाहणाऱ्यांना आश्‍चर्य वाटतं. खुद्द अश्विनीताई मात्र ३० वर्षांपासून नेटाने नवऱ्याच्या वाहतूक व्यवसायात बरोबरीने वाटचाल करत आलेल्या आहेत. मालकीण, ड्रायव्हर व क्‍लीनर अशा तिन्ही भूमिकांमध्ये त्या सहजतेने वावरताना दिसतात. आणखी दोघीजणी त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून त्यांच्याकडूनच ट्रक चालवायला शिकल्या आहेत.

मूळ पुण्यातील उमा गद्रेंचं नाव लग्नानंतर अश्विनी अशोक भुस्कुटे झालं. नावच नाही तर जगणंच बदलून गेलं. त्या म्हणाल्या, ‘‘नवऱ्याचा टूरिंगचा व्यवसाय. त्याने मला आधीच सांगितलं होतं की, माझ्या व्यवसायात बरोबरीने उभी राहणार असशील तर, वेळ पडली तर ट्रक आणि बस चालवणार असशील तर माझ्याशी लग्न कर. मलासुद्धा अवजड वाहन चालवायची इच्छा होती. सुरवातीला व्हॅन चालवायचे. लग्नानंतर डोंबिवलीला सासरी गेले. नंतर नवऱ्याने वाहतूक व्यवसायासाठी चिपळूणला यायचा निर्णय घेतला. इथं ३० वर्षांपासून मी गरजेप्रमाणे बस आणि ट्रक चालवते.

एकदा आजेसासूबाई आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यांना नंतर गावी जायचं होतं. घरची वाहनं आणि वाहतूक व्यवसाय असूनही ऐनवेळी चालक मिळेना. त्यांनीच मला ती कामगिरी पार पाडायला लावली. मग आत्मविश्वास वाढला. ट्रकचालकासाठीचा परवाना काढायला गेले तर तिथल्या अधिकाऱ्यांचा विश्वास बसेना. मी ट्रक चालवून दाखवला. ते काहीच बोलले नाहीत. आठ दिवसांनी पुन्हा बोलावून ट्रक चालवून दाखवायला सांगितलं. मी तसं केल्यावर ते म्हणाले की, फार काळजीपूर्वक आणि छान चालवता. कुठे शिकलात? मी तर फक्त मॅकेनिक आणि नवऱ्याच्या सूचना ऐकून आणि त्याप्रमाणे चालवून पाहात स्वतःची स्वतःच शिकले होते. या कामाने मला वेगळी ओळख मिळवून दिली. आता माझं पाहून दोघीजणी माझ्याकडूनच ट्रक चालवायला शिकल्या आहेत. त्यातली एक घरच्या आंब्याच्या व्यवसायासाठी ट्रक चालवून स्वावलंबी झाली आहे.’’

अडचणीत आलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी माझी ‘दुर्गाशक्ती’ नावाची संस्था आहे. मला पोटची मुलं आहेत तरीही मी दोन मुलं दत्तक घेतली आहेत. त्यांना त्यांच्या पायांवर उभं करायचं आहे. माझ्या संस्थेच्या माध्यमातून मुलींना आत्मसंरक्षणासाठीचं तंत्र शिकवते. आमच्या कोकणात एका वाडीपासून दुसऱ्या वाडीपर्यंत जायला सुमारे चार-पाच किलोमीटर अंतर पार करावं लागतं. या दरम्यान एकट्यादुकट्या पोरीबाळींवर बलात्कार होतात. मारून टाकलं जातं. यासाठी मी आत्मसंरक्षणासाठी त्यांना सज्ज करते. महिलांनी बसचालक होणं फारसं कठीण नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर हेही जमू शकतं. आयुष्यात चढ-उतार येत असतात. अवघड वळणं किंवा अकस्मात ओढणाऱ्या अडचणीही येतात. आपण डगमगायचं नसतं. आपला प्रवास आपण पूर्ण जबाबदारीने सुरूच ठेवायचा असतो, हेच मी माझ्या संस्थेत येणाऱ्या महिलांना सांगत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com