Video : अरे! पिंपरीमधील आनंदनगरमध्ये 'हे' चाललंय काय? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टंसिंगचे पालन नाही, जमाव व संचारबंदीचा पत्ता नाही, असे चित्र बुधवारी चिंचवड स्टेशन परिसरातील कंटेन्मेंट झोन असलेल्या आनंदनगरमध्ये बघायला मिळाले.

पिंपरी ः तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टंसिंगचे पालन नाही, जमाव व संचारबंदीचा पत्ता नाही, असे चित्र बुधवारी चिंचवड स्टेशन परिसरातील कंटेन्मेंट झोन असलेल्या आनंदनगरमध्ये बघायला मिळाले. हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आणि "अन्नधान्य घरपोच द्या, दुकाने उघडू द्या' अशी मागणी केली. पोलिस व महापालिका आयुक्तांनी सेवासुविधा घरपोच देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिक आपापल्या घरी परतली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आनंदनगर. चिंचवड स्टेशन परिसरातील झोपडपट्टी. पुणे-मुंबई महामार्ग व लोहमार्गालगतची वसाहत. गेल्या चार दिवसांपूर्वी येथे दोन जण कोरोनाबाधित आढळले आणि सर्व वस्ती सील केली. कंटेन्मेंट झोन जाहीर झाला. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी आणखी सहा जणांना बाधा झाल्याचे आढळले. सोमवारी (ता. 18) तर कहरच झाला. एकाच दिवशी तब्बल 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. मंगळवारी पाच जणांना बाधा झाली. बुधवारी दुपारी तीनपर्यंत आणखी तिघांना संसर्ग झाल्याचे आढळले. अवघ्या चार दिवसांत सुमारे 36 जण पॉझिटीव्ह आढळले.

दरम्यान, वस्तीत जाणाऱ्या पाचही वाटा पत्रे लावून बंद केल्या. संसर्ग झालेल्या नागरिकांच्या संपर्कातील व्यक्तींना एका शाळेत क्वॉरंटाइन केले. मात्र, लोक ऐकत नव्हते. पत्रे उचकटून बाहेर पडत होते. अखेर पोलिस बंदोबस्त वाढत होता. मात्र, बुधवारी नागरिकांनी सर्व नियम धुळकावून लावत चिंचवड गावात जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाखाली जमले. मालधक्का परिसरात हजारोच्या संख्येने नागरिक आले. त्यात महिलांची संख्या अधिक होती. 

किराना दुकाने उघडू द्या. भाजीपाल्याची दुकाने सुरू ठेवा. मेडीकल स्टोअर्स सुरू ठेवा. अन्नधान्य मोफत द्या. जेवणाची व्यवस्था करा, अशा मागण्या त्यांनी केल्या. त्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वांना समजावण्याच्या प्रयत्न केला. सर्व व्यवस्था घरपोच मिळेल. कम्युनिटी किचर सुरू केले आहे. त्यामुळे सर्वांना घरपोट अन्न मिळेल. किराना दुकाने व मेडिकल स्टोअर्स उघडे राहतील असे आश्‍वासन दिले. तरीही महिला ऐकायला तयार नव्हत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अखेर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर दुपारी एकच्या सुमारा घटनास्थळी पोचले. त्यांनी महिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले. आनंदनगर भागातील किराना दुकाने व मेडिकल स्टोअर्स सुरूच राहतील, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर महिला व अन्य नागरिक आपापल्या घरी निघून गेले. 

वास्तविकतः कंटेन्मेंट झोनमधील किराना दुकाने व मेडीकल स्टोअर्स यांच्या वेळा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र, काही व्यापाऱ्यांनी भितीपोटी दुकाने बंद ठेवली आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking all the rules People of Anandnagar on the streets