मेहरून्निसा दलवाई यांचे निधन

स्वप्नील जोगी
गुरुवार, 8 जून 2017

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच सेक्युलर भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले.

पुणे- मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच सेक्युलर भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले.

शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. बुधवारी रात्रीपर्यंत त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पण रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे रुबिना व इला या दोन मुली व नातवंडे आहेत.

दलवाई यांच्या निधनानंतर गेली चाळीस वर्षे त्यांचे विचार सातत्याने पुढे नेण्यात मेहरून्निसा यांची महत्त्वाची भूमिका होती. 'हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या त्या अध्यक्ष होत्या. तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यातही त्या अनेक वर्षे सक्रिय होत्या. 'मी भरून पावले आहे' हे 1995 मध्ये प्रकाशित झाले त्यांचे आत्मचारित्र प्रसिद्ध आहे.

मुस्लिम समाजातील समाजसुधारणा चळवळी, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांबद्दलच्या चळवळी आणि आंदोलने यांत मेहरून्निसा यांचा सक्रिय सहभाग असे. आपल्या कार्यात त्या अखेरपर्यंत सहभागी होत्या.

हमीद दलवाई यांनी समाजसुधारणेचा पायंडा घालून देण्यासाठी आपल्या अंतिम इच्छेनुसार मुस्लिम असूनही मरणोत्तर आपल्या देहाचे दहन करावे, असे त्याकाळी सांगितले होते. मेहरून्निसा दलवाई यांनी त्याही पुढे एक पाऊल पुढे जात आपल्या देहदानाचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानुसार, हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी सात वाजता त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान केले जाणार आहे.

Web Title: Breaking news pune news Sakal News Mehrunnisa Dalwai passes away