esakal | पोलिस भरती लेखी परीक्षेचा पेपर सोपा गेल्याने सुटकेचा निःश्‍वास I Police Recruitment
sakal

बोलून बातमी शोधा

Candidate

पोलिस भरती लेखी परीक्षेचा पेपर सोपा गेल्याने सुटकेचा निःश्‍वास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोणी गडचिरोली, यवतमाळहून, तर कोणी लातूर, औरंगाबाद, नाशिकहून रात्रभर प्रवास करून पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मंगळवारी पहाटेच पुण्यात दाखल झाले. काहींनी एक दिवस आगोदरच नातेवाइकांकडे मुक्काम केला. मोठ्या प्रयत्नानंतर सकाळपासून फिरणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्र सापडले. त्यानंतर पुढचा दीड तास हातात आलेला पेपर सोपा गेल्यानंतर उमेदवार सुटकेचा निःश्‍वास टाकत परीक्षा केंद्रांबाहेर पडले.

पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे २०१९ ची शिपाई पदासाठी मंगळवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. बहुतांश उमेदवार दूरचा प्रवास असल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले. तर उर्वरित उमेदवार रात्रीचा प्रवास करून पहाटेच्या सुमारास बसस्थानकांच्या परिसरात उतरले. अनेकांनी एसटी, बसथांबे, रेल्वेस्थानकांच्या परिसरातच रात्रीचा मुक्काम केला. त्यानंतर सकाळपासूनच उमेदवार परीक्षा केंद्र शोधण्यासाठी निघाले.

ग्रामीण भागातून आलेल्या तरुण-तरुणींना परीक्षा केंद्र सापडताना अडचण आली. तरीही सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर हळूहळू केंद्रांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली.

पुणे पोलिसांकडून परीक्षा केंद्रांच्या बाहेर फलकांवर खोली व बैठक क्रमांक लावण्यात आले होते. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत पोलिसांकडून उमेदवारांचे ओळखपत्र, प्रवेशपत्र पाहून तसेच त्यांची बायोमेट्रीक तपासणी केल्यानंतर त्यांना तत्काळ परीक्षा खोल्यांमध्ये पाठवून गर्दी टाळण्यात आली.

हेही वाचा: पुणे महापालिकेचे डोळे राज्य शासनाकडे थकीत असलेल्या १००० कोटीकडे

वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर झालेल्या उमेदवारांनाही पेपर सुरू होण्यापूर्वी प्रवेश दिला. पोलिसांकडून उमेदवारांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात आले. दीड तास परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांनी सुटकेचा निःश्‍वास टाकत पुन्हा आपल्या गावचा रस्ता धरला.

आम्ही रात्री नातेवाइकांकडे राहिलो. सकाळी लवकरच परीक्षा केंद्रावर पोचलो. गणिताचे काही प्रश्‍न वगळता पेपर सोपा गेला. पोलिसांकडूनही चांगले सहकार्य मिळाले. कोणतीही अडचण आली नाही.

- आयता भोसले, कामरगाव, नगर

सोमवारी रात्रीच पुण्यात आलो. बसस्थानकावर रात्र काढली. पावसामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याची भीती वाटत होती. परीक्षा केंद्र शोधण्यात खूप वेळ गेला. पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा घेतली.

- विशाल इंगळे, सिल्लोड, औरंगाबाद

मी शेतीत मजुरी करतो. माझी तिन्ही मुले लेखी परीक्षेला बसली होती. आम्ही नगरहून सोमवारी रात्री पुण्यात आलो. कात्रज येथील भाजीविक्रेते अरुण पवार यांच्याकडे पूर्वी काम करीत होतो. त्यांच्याकडेच आम्ही मुक्काम केला. त्यानंतर मंगळवारी तिन्ही मुलांना परीक्षा केंद्रांवर पोचविले.

- रिमान भोसले, पालक

लेखी परीक्षेचा पेपर सोपा होता. परंतु लेखी परीक्षेऐवजी मैदानी चाचणी अगोदर घेतली पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुलेच पोलिस भरतीत जादा गुण मिळवून पुढे जातील. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात तयारी करणाऱ्या मुलांवर अन्याय होतो.

- तुषार पगार, चांदवड, नाशिक

loading image
go to top