Loksabha 2019 : आधी मतदान, मग लग्न; नववधूने बजावला मतदानाचा हक्क 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

निळ्या रंगाची नऊवारी साडी आणि मुंडावळ्या बांधून केंद्रावर प्रवेश केल्यावर मतदानासाठी आलेले नागरिक तिच्याकडे पाहतच राहिले. मतदानाला जाण्यासाठी श्रद्धाला सर्वजण जागा करून देण्याचा प्रयत्न करत होते.

पुणे, ता. 23 : लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तुळशीबागेत राहणाऱ्या श्रद्धा भगत हिने नूमवी शाळेतील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला. श्रद्धाचे सायंकाळी पाच वाजता भुगावमधील दुर्वांकुर लॉन्समध्ये लग्न आहे. भुगावमधील शेतकरी कुटुंबातील अमित सातपुते यांच्याशी त्या आज विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र लग्नाच्या या शुभमंगल दिनी राष्ट्रीय कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावे म्हणून तिने आधी मतदान केले आणि त्यानंतर ती लग्नाच्या ठिकाणी रवाना झाली.

निळ्या रंगाची नऊवारी साडी आणि मुंडावळ्या बांधून केंद्रावर प्रवेश केल्यावर मतदानासाठी आलेले नागरिक तिच्याकडे पाहतच राहिले. मतदानाला जाण्यासाठी श्रद्धाला सर्वजण जागा करून देण्याचा प्रयत्न करत होते. पण ती रांगेत मतदान करणार असल्याचे तिने स्पष्ट केले. 

"आज मी एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पण त्याच दिवशी मतदान आहे. याचा मला खूप आनंद होत असून नव्या आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत आहे. माझ्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: A Bride casts vote before leaving for her Wedding in Pune Loksabha Constituency for Loksabha 2019