Ganeshotsav 2020 : १२८ वर्षातं पहिल्यांदाच मिरवणूकीविना होणार बाप्पाचं विसर्जन!

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 30 August 2020

१९६५ला ज्या दिवशी गणपती बसला त्या दिवशी पुण्यात दंगल झाली होती आणि भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले होते.

Ganesh Festival : पुणे : प्लेगची साथ, इंग्रजांनी गणेशोत्सवावर घातलेले बंधन, भारत-पाकिस्तान युद्ध असो की, पानशेत धरण फुटून पुण्याची झालेली वाताहत असो, पण गेल्या १२८ वर्षाच्या इतिहासात पुणेकरांनी गणेशोत्सव दणक्‍यात साजरा केलाच, शिवाय बाप्पाला निरोपही वाजत गाजतच दिला. मात्र, यंदा कोरोनामुळे या वैभवशाली गणेशविसर्जन मिरवणुकीच्या परंपरेत खंड पडणार आहे. मानाच्या गणपतींसह सर्वच गणपतींचे मिरवणुकीविना मांडवातल्या मांडवातच विसर्जन करणार असल्याची नोदं इतिहासात होणार आहे.

पुण्याचा गणेशोत्सव जेवढा भव्य असतो, तेवढीच विसर्जन मिरवणूक ही देखणी असते. मात्र, कोरोनामुळे या आनंदावर यंदा पाणी फेरले आहे. जुन्या पुण्याचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, "२०२० मध्ये विसर्जन मिरवणुकीविना गणेश विसर्जन ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ आली होती, तेव्हाही विसर्जन मिरवणूक निघाली होती, त्यानंतर १९१७ मध्ये फ्लूच्या साथीचे संकट पुणेकरांवर आले होते. तरीही मंडळांनी वाजत गाजत मिरवणूक काढली होती.

जिल्हा परिषद आणि 'पीएमआरडीए'च्या महसूलला बसणार फटका; राज्य सरकारच्या चलाखीचा परिणाम​

देश स्वतंत्र व्हावा म्हणून १९४२ ला इंग्रजांविरोधात 'चले जाव' आंदोलन पुकारण्यात आले होते. हे आंदोलन पेटलेले असल्याने ब्रिटिशांनी गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी घातली होती. तरीही रास्ता पेठेतील धर्मवीर डावरे आणि केळकर यांनी मिरवणूक काढल्याने त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबून ठेवले. त्यावेळी केसरी गणेशोत्सव नियामक मंडळाने शक्‍य होईल त्यांनी आपआपल्या मंडळात विसर्जन करावे, ज्यांना शक्‍य नाही त्यांनी केसरीकडे गणपती द्यावा, असे आवाहन केले. पुण्यातील अनेक मंडळांनी केसरीकडे गणपती दिले. त्यानंतर चाळीस दिवसांनी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेस ब्रिटिशांनी केसरीच्या नावाने मिरवणूकीस परवानगी दिल्याची नोंद आहे.

१९६१ ला पानशेत धरण फुटल्याने पुण्यात मोठे नुकसान झाले, तरीही पुणेकरांनी नेटाने गणेशोत्सव साजरा करून विसर्जन मिरवणूक काढली होती. गणेशोत्सवाच्या इतिहासात २०२० हे असे एकमेव वर्ष आहे की, यंदा महामारीमुळे विसर्जन मिरवणूक न काढता मांडवातच विसर्जन केले जाणार आहे, असे लवाटे यांनी सांगितले.

वीजमीटर रिडींग पाठविण्यासाठी महावितरणने वाढवली मुदत; आता २४ तास नव्हे तर...​

अन् वातावरण बदलले
१९६५ला ज्या दिवशी गणपती बसला त्या दिवशी पुण्यात दंगल झाली होती आणि भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले होते. दंगलीमुळे संपूर्ण गणेशोत्सवात पुण्यात कर्फ्यू होता. युद्धामुळे सायंकाळी चारनंतर गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी होती, पण विसर्जनाच्या दिवशीच भारताने युद्ध जिंकल्याची बातमी धडकली अन् संपूर्ण वातावरण बदलून गेले. त्यानंतर मिरवणूक पूर्ण झाली होती, असा प्रसंग घडल्याचेही लवाटे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brijmohan Patil write an article about Pune Ganeshotsav 2020