बसगाड्या नसल्याने बीआरटी रखडली

ज्ञानेश्‍वर बिजले
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता यादरम्यानच्या रस्त्यावरील नियोजित बीआरटी मार्ग बसगाड्या नसल्यामुळे सुरू होत नसल्याचे स्पष्ट झाले. या मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गामध्ये येणाऱ्या दोन औद्योगिक कंपन्या तेथून स्थलांतरित करण्याच्या प्रलंबित प्रस्तावावर येत्या चार डिसेंबरला बैठक होणार आहे.

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता यादरम्यानच्या रस्त्यावरील नियोजित बीआरटी मार्ग बसगाड्या नसल्यामुळे सुरू होत नसल्याचे स्पष्ट झाले. या मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गामध्ये येणाऱ्या दोन औद्योगिक कंपन्या तेथून स्थलांतरित करण्याच्या प्रलंबित प्रस्तावावर येत्या चार डिसेंबरला बैठक होणार आहे.

हा नवीन सव्वा दहा किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे. या मार्गावर बांधलेल्या संत मदर तेरेसा पूल वाहतुकीला खुला झाला. यादरम्यान बीआरटीसाठी स्वतंत्र लेन आणि बसथांबे बांधण्याचे काम महापालिकेने सुरू ठेवले. बीआरटी लेनच्या मध्यभागी असलेल्या पंधरा बसथांब्यांपैकी १२ थांबे बांधून पूर्ण झाले आहेत. लिंक रस्ता आणि संत मदर तेरेसा पूल येथे जमिनीपासून उंचावर असलेल्या बसथांब्याचे काम सुरू आहे. औद्योगिक कंपन्यांजवळ असलेला बसथांबा अद्याप बांधण्यास सुरू करण्यात आलेला नाही. डेडिकेटेड लेनचे काम पूर्ण झाले आहे.

या मार्गात २७०० चौरस मीटर क्षेत्रावर इंडोलिंक आणि इरोसिटी या दोन कंपन्यांचे स्थलांतर करण्यासाठी महापालिका गेले तीन वर्षे एमआयडीसीकडे पाठपुरावा करीत आहे. या कंपन्यांना अन्यत्र जागा देण्याचे तसेच बांधकामाचा मोबदला देण्याचे महापालिकेने मान्य केले. त्यासाठी सव्वासहा कोटी रुपयांची तरतूद केली. एमआयडीसीने त्या संदर्भात अद्याप निर्णय घेतला नसून, त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचे महापालिकेचे बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले.

बीआरटी लेन ही साडेसात किलोमीटरपर्यंत डेडिकेटेड आहे. त्यानंतर कुदळवाडीमध्ये २४ मीटर रुंदीचा रस्ता असल्याने तेथे मिश्र स्वरूपाची वाहतूक असेल. तेथे रस्त्याच्या कडेला स्टेनलेस स्टीलचे सहा बसथांबे उभारण्यात येतील. मोठ्या बसथांब्यांचे दरवाजे बसविण्याचे काम थांबविले आहे.

बीआरटी मार्गाची लांबी - १०.२५ कि.मी.
अपेक्षित खर्च - २० कोटी रुपये
मार्गाची रुंदी - ४५ मीटर
झालेला खर्च - १५ कोटी रुपये
बसथांबे - २१
गाड्या - १५

बीआरटी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बीआरटी गाड्या नसल्यामुळे हा मार्ग सुरू करता आला नाही. मार्ग सुरू करण्याचे ठरल्यानंतर, बसथांब्यांना दरवाजे बसविण्याचे काम पंधरवड्यात पूर्ण करू.
- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, बीआरटी

बीआरटीसाठी नवीन गाड्या येत्या दोन महिन्यांत येतील. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता यादरम्यानच्या नवीन बीआरटी मार्गासाठी पंधरा गाड्या लागणार आहेत. गाड्या आल्यानंतर हा मार्ग सुरू करू.
- विलास बांदल, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Web Title: BRT Route Issue Bus