बीएसएनएलचे डिस्कनेक्‍टिंग इंडिया

बीएसएनएलचे डिस्कनेक्‍टिंग इंडिया

पुणे - बड्या उद्योगपतींच्या भल्यासाठी सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचे अनिर्बंध धोरण सरकारने स्वीकारले आहे. एअर इंडिया, महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सार्वजनिक क्षेत्रानंतर आता भारत संचार निगम लिमिटेडचा (बीएसएनएल) क्रमांक आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांची ५जी सेवेकडे वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल मात्र ३जी मध्येच अडकले आहे. 

४जी सेवेअभावी मागील तीन वर्षांत महाराष्ट्रातील बीएसएनएल ग्राहकांची संख्या तब्बल ६ लाख ३२ हजार ९०९ एवढी कमी झाली आहे. याला रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केला जात नाही. ही सरकारी कंपनी दिवाळखोरीत काढून खासगी कंपन्यांची भलावण करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे दिसत आहे.

बीएसएनएलला ४ जी स्पेक्‍ट्रम मिळविण्यासाठी १४ हजार कोटींची गुंतवणूक आवश्‍यक आहे. मात्र आवश्‍यक कर्ज सरकारी बॅंकांमधून घेण्यास निती आयोगाने विरोध केला आहे. त्याच वेळी खासगी दूरसंचार कंपन्यांना सरकारी बॅंकांमधून आठ लाख कोटींपेक्षाही अधिक कर्ज देण्यात आले आहे. बीएसएनएलने जाहीर केलेल्या २०१७-१८ च्या वार्षिक अहवालात मागील दोन वर्षांत ‘बीएसएनएल’चे ८ हजार कोटींचे नुकसान झाले असून, सेवा देण्यात कमी पडल्याने उत्पन्नात २० टक्के घट आली असल्याचे स्पष्ट केले आहे.

१२ डिसेंबर २०१८ रोजी लोकसभेत ४जी सेवा सुरू करण्याविषयी दूरसंचार मंत्रालयाला विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी ४जी सेवा देण्यासाठी काही मोजक्‍या ठिकाणी परवाना देण्यात आल्याचे सांगितले. त्याच वेळी २०१७-१८ च्या वार्षिक अहवालात बीएसएनएलकडे ४ जी स्पेक्‍ट्रम नसल्याचे नमूद केले  आहे. काही ठिकाणची ४ जी सेवा ही ३ जी स्पेक्‍ट्रम वरूनच दिली जात असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

बीएसएनएलचे प्रधान प्रबंधक अरविंद वडनेरकर म्हणाले, ‘‘बीएसएनएलचे नुकसान झाले असले तरी ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. उलट ती वाढली आहे. खासगी कंपन्यांचे अनेक ग्राहक आपला नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहेत. महाराष्ट्रातील बुलडाणा, उस्मानाबादसारख्या भागामध्ये ४ जी सेवा सुरू करण्यात आली आहे.’’

महाराष्ट्रातील ग्राहकांची संख्या
  जानेवारी २०१६ :     ४४ लाख २७ हजार ६०४
  जानेवारी २०१७ :     ४३ लाख ७२ हजार ५९४
  जानेवारी २०१८ :     ४१ लाख ४२ हजार ९६
  डिसेंबर २०१८ :     ३७ लाख ९४ हजार ६९५
  कमी झालेली ग्राहक एकूण संख्या :     ६ लाख ३२ हजार ९०९

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलचे ६५ टॉवर बंद आहेत. अनेक कार्यालयातील विजेचे शुल्क न भरल्यामुळे महावितरणकडून सेवा खंडित केली आहे. हे सरकार जाणीवपूर्वक ही कंपनी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. 
- अरविंद सावंत, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com