
हॉटेल व ढाब्यांवर बैलगाड्या मूर्तीच्या स्वरूपात तयार केल्या आहेत. जेवणासाठी येणाऱ्या पर्यटकांस मावळची संस्कृती पाहावयास मिळावी म्हणून अशा बैलगाड्या बनवून ठेवल्या गेल्या आहेत.
टाकवे बुद्रूक (पुणे) : शेतीव्यवसाय हद्दपार होत चालल्याने मावळातील ग्रामीण भागात असणारे शेतकऱ्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणजे बैलगाडी इतिहासजमा होण्याच्या मार्गांवर आहे. शेतकऱ्यांकडे कमी वेळात मालवाहतूक करणाऱ्या व शेतीची कामे जलद गतीने करणाऱ्या ट्रॅक्टरची संख्या वाढल्याने बैलगाड्यांची संख्या घटू लागली आहे. सध्या तालुक्यात आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी ट्रकरसारख्या अत्याधनिक अवजारांचा वापर करतात. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैल संभाळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या बैलगाड्या उरल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला बैलगाड्या केवळ पुस्तकातच पाहायला मिळेल, अशी सध्याची स्थिती आहे.
असा होत होता बैलगाडीचा वापर
- वाहतुकीचे सर्वात जुने साधन म्हणजे बैलगाडी
- चाकांचा शोध लागल्यानंतर प्रवासासाठी बैलगाड्या विशेष कारागिरांकडून बनविल्या जायच्या
- शेतकऱ्यांची प्रतिष्ठा म्हणजे बैलगाडी असे
- शेतातील धान्य, पेंढा, गवत बैलगाडीतून गोठ्यापर्यंत आणण्यासाठी साधन
- लेकी-सुनांना सासरी-माहेरी सोडायला
- लग्नात वऱ्हाड घेऊन जायला तसेच लग्न झाल्यावर नवरी-नवरदेव घरी आणायला
- ग्रामदैवतांच्या यात्रांमध्ये दर्शनास जायला
- रुग्णांना दवाखान्यात घेऊन जायला-आणायला
- गावपुढाऱ्यांच्या मिरवणुका बैलगाडयातून काढल्या जायच्या.
सध्या होणारा वापर
- लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव टहाळा म्हणून आंब्याच्या व जांभूळच्या झाडाचे टहाळे आणण्यासाठी वापर
- ऊसतोड कामगार तोडलेला ऊस रस्त्यावर व ट्रकपर्यंत आणण्यासाठी वापर
संख्या घटण्याची कारणे
- शेतीव्यवसाय हद्दपार चालल्याने प्रमाण कमी
- यांत्रिक मशागतीमुळे वापर घटला
- बैलगाडा शर्यतींना बंदी
- बैलांची संख्या घटल्याने वापर कमी
- बैलगाडी बनविणारे कुशल कारागिरांचा अभाव
उरल्या देखाव्यापुरत्या
हॉटेल व ढाब्यांवर बैलगाड्या मूर्तीच्या स्वरूपात तयार केल्या आहेत. जेवणासाठी येणाऱ्या पर्यटकांस मावळची संस्कृती पाहावयास मिळावी म्हणून अशा बैलगाड्या बनवून ठेवल्या गेल्या आहेत. कृषिपर्यटन स्थळांमध्ये बैलगाड्यांतून पर्यटकांची सवारीही करण्यात येत आहे. भावी पिढीला फक्त पुस्तकात व छायाचित्रात बैलगाडी पाहण्यास मिळण्याची शक्यता असल्याने बैलगाड्यांचे जतन होणे गरजेचे आहे.
‘‘पूर्वी बैलगाडी ही शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचे साधन होते. बैलगाडीसाठी ना पेट्रोलची गरज होती ना टायर-ट्यूब ची. बांबूत ठेवलेलं वंगण कण्याला लावलं आणि बैले गाडीला जोडली की बैलगाडी शेती कामासाठी तयार होत असे. ट्रॅक्टरमुळे बैलगाड्या कमी होत चालल्या आहेत.’’
- नथू राघू वाडेकर, शेतकरी, नाणोली