पुण्यासह औरंगाबादमध्ये घरफोड्या करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

शहराच्या वेगवेगळ्या भागांसह औरंगाबाद शहरामध्येही घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांसह औरंगाबाद शहरामध्येही घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सय्यद हनीफ सय्यद हबीब (वय 20, रा. रोशन गेट मशिदीसमोर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकातील सीसीटीव्ही व त्याच्या व्याप्तीबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व अन्य पोलिस अधिकारी एसटी स्थानकाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी व चर्चा करीत होते. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक अरुण वायकर व त्यांचे पथक शिवाजीनगर परिसरामध्ये गस्त घालत होते. तेव्हा एसटी स्थानकातील प्रवाशांमधून अचानक चोर, चोर असा आवाज आला. त्या वेळी गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी चोरट्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून तपासणी केली, त्या वेळी त्याच्याकडील मोबाईल, एक सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, कानातील रिंगा व रोख रक्कम पाच हजार रुपये असा 49 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चोरीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने मोबाईल बुधवार पेठेतून, तर सोन्याचे दागिने औरंगाबाद येथून चोरल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. औरंगाबाद येथून त्यास तडीपार करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: burglar arrested in Aurangabad