दौंड - दौंड शहरात रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस निरीक्षकांच्या बंगल्यात चोरी झाली आहे. चोरीत १२.८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, अडीचशे ग्रॅम वजनाची चांदी आणि रोकड चोरीला गेली आहे..दौंड रेल्वे स्थानकासमोर लोहमार्ग न्यायालयासमोर दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक अमित जैन यांच्या बंगल्यात ही चोरी झाली आहे. १० जून रोजी ही चोरी उघडकीस आली. जैन कुटुंबीय हे परगावी गेले असताना रेल्वेच्या या बंगल्यात चोरी झाली. जैन कुटुंबीय दौंड येथे परतल्यावर ही चोरी उघडकीस आली. चोरांनी प्रवेशद्वाराचा कडी कोयंडा आणि आतील कपाटांचे कुलूप तोडून ही चोरी केली..बंगल्यातील चोरीत १२.८ तोळे वजनाचे सोन्याची साखळी, मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या, २५० ग्रॅम वजनाच्या चांदीचे पायातील आभूषणे, रोख १ लाख ७३ हजार रूपये, असा एेवज चोरीस गेला आहे. दौंड पोलिस ठाण्यात या चोरी प्रकरणी ११ जून रोजी लवली अमित जैन यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (राहते घर किंवा वाहतुकीची साधने किंवा उपासना स्थळ, आदींमधील चोरी), कलम ३३१ (घरफोडी करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दौंड रेल्वे स्थानक आणि परिसरातून सोने व चांदीचे दागिने आणि मोबाईल संच चोरीस जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. लोहमार्ग न्यायालयाच्या अगदी समोर पोलिस निरीक्षक अमित जैन यांचा बंगला आहे. बंगल्यासमोर रेल्वे पादचारी पूल, रेल्वेचे सशुल्क वाहनतळ व रिक्षा स्टॅण्ड आहे. तर बंगल्याशेजारी शिशू विकास मंदिर हे विद्यालय आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथक आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बंगल्यात चोरी झाल्याने पुणे ग्रामीण पोलिसांची निष्क्रियता उघड झाली आहे..रेल्वेच्या गुलबर्गा-सोलापूर-दौंड-पुणे, अहिल्यानगर-दौंड कॅार्ड लाइन स्थानक-पुणे, पुणे-दौंड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी गाड्यांमधील दागिन्यांच्या बॅग व पर्सची चोरी, चार्जिंगला लावलेल्या मोबाईल संचांची चोरी, लॅपटॅाप व टॅब चोरीचे प्रमाण वाढले आहे. पुणे रेल्वे विभागातील दौंड सह अन्य मोठ्या रेल्वे स्थानकांवर वावरणारे, स्थानकाच्या बाहेर तळ ठोकून राहणारे आणि प्रवासी गाड्यांमध्ये वावरणार्या अल्पवयीन मुलांचा व महिलांचा या चोर्यांसाठी वापर होत असताना रेल्वे प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिस त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे..दौंड तालुक्यातील खोरवडी व आलेगाव येथे १० जून रोजी चार ठिकाणी दरोडा पडला होता. सात दरोडेखोरांनी प्रतिकार करणार्या महिलांना काठ्यांनी मारहाण केली होती तर पुरूषांवर चाकू हल्ला केला होता. दौंड पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहे परंतु सात दिवसानंतरही तपास सुरू आहे. दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी असेल्या रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस निरीक्षकांच्या बंगल्यात चोरी होऊन सात दिवस उलटले तरी पुणे ग्रामीण पोलिस दलातील दौंड पोलिसांना चोरांचा शोध घेता आलेला नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.