राक्षेवाडीत दोन घरफोड्यांत नऊ लाखांचा ऐवज लंपास

राक्षेवाडीत दोन घरफोड्यांत
नऊ लाखांचा ऐवज लंपास
Published on: 

राजगुरुनगर, ता. २१ : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील शिक्षक कॉलनी परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरांचे दरवाजे तोडून तब्बल ८ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी (ता. २०) रात्री देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी घरातील माणसे बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बुधवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ही घरफोडी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षेवाडी येथील शिक्षक कॉलनीत राहणारे महेंद्र दिनकर गिरीगोसावी (वय ३५) हे कुटुंबासह देवी विसर्जनासाठी बाहेर गेले होते. या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी व लॅचचा भाग तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाची तोडफोड करून नवीन वाहन खरेदीसाठी ठेवलेली ४ लाख ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच एक तोळा वजनाची सोनसाखळी आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची कंठमाळही चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी याच परिसरातील हौशीराम दगडू कुटे यांच्या घरालाही लक्ष्य केले. घराचा मुख्य दरवाजा तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी हॉलमधील लाकडी व लोखंडी कपाट फोडले. त्यातील अंदाजे ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. एकाच परिसरातील दोन घरांचे दरवाजे तोडून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महेंद्र गिरीगोसावी यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com