शिरूर - व्यवसाय वाढीसाठी पाच कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवित पन्नास लाख रूपये कमिशनपोटी घेऊनही कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील व्यावसायिकाने मानसिक तणावातून गळफास घेत संपविले जीवन.
सोमवारी (ता. ३० मार्च) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या खराडी येथील व्यवस्थापकासह दोघांना आज अटक केली.
संग्राम आबुराव सातव (वय-४६, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून, जनाबाई संग्राम सातव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या खराडी शाखेचा व्यवस्थापक उपेंद्र यशवंत पाटील (रा. थेरगाव, पुणे) तसेच मच्छिंद्र पोपट झंजाड (रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि विशाल घाटगे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरूद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशाल घाटगे हा फरार झाला असून, पाटील व झंजाड यांना अटक करण्यात आली. त्यांना शिरूर न्यायालयाने शनिवार (ता. ५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत सातव यांची रांजणगावातील लांडेवस्ती येथे जे. एम. एन. इंजिनिअरींग प्रा. लि. नावाची रबर साहित्याची कंपनी असून, या कंपनीच्या वाढीसाठी व व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज हवे असल्याने इंडोस्टार फायनान्स कंपनीचा खराडी येथील व्यवस्थापक उपेंद्र पाटील यांनी सातव यांना भेटून पाच कोटी रूपये कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखविले व कमिशनपोटी त्यांच्याकडून चाळीस लाख रूपये घेतले.
विशाल घाटगे याने पन्नास लाख रूपये कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात पाच लाख रूपये कमिशन घेतले व झंजाड यानेही कर्ज करून देण्याच्या मोबदल्यात तीन लाख रूपये कमिशनची मागणी केली.
दरम्यान, सातव यांनी स्वतःच्या राहत्या घरावर कर्ज काढून तसेच काही मित्रांकडून व ओळखीच्या लोकांकडून उसने पैसे घेऊन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. काही दिवस गेल्यानंतर कर्जमंजूरीबाबत सातव यांनी संपर्क साधला असता पाटील, घाटगे व झंजाड यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांचे फोन घेणे बंद केले.
सातव यांनी वेळोवेळी संपर्क साधूनही तिघांनीही त्यांचे फोन न घेता त्यांना भेटण्याचे टाळले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने सातव यांनी मानसिक तणावातून रविवारी (ता. २९ मार्च) रात्री उशिरा कंपनीतील खोलीत गळफास घेऊन संपविले जीवन.
या गंभीर घटनेची दखल घेत रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांनी पोलिस पथकासह तपासाची चक्रे वेगाने फिरवून पाटील व झंजाड यांना अटक केली. पुढील तपास तिडके करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.