इंटरनेटवर अभ्यास करून शेतकऱ्याने घेतले परदेशी झुकिनीचे भरघोस उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

foreign zucchini
इंटरनेटवर अभ्यास करून शेतकऱ्याने घेतले परदेशी झुकिनीचे भरघोस उत्पादन

इंटरनेटवर अभ्यास करून शेतकऱ्याने घेतले परदेशी झुकिनीचे भरघोस उत्पादन

ओतूर - पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत उदापूर (ता. जुन्नर) येथील उच्चशिक्षित (High Education) तरुण शेतकरी (Farmer) समीर खंडेराव शिंदे (Samir Shinde) यांनी परदेशी झुकिनी (Foreign Zucchini) या भाजीचे उत्पादन (Vegetable Production) घेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून परदेशी फळ भाजी पाल्याचा सखोल अभ्यास करून भरघोस उत्पादन घेत फायदेशीर आधुनिक शेतीची किमया त्यांनी साधली आहे.

शिंदे यांना मशागतीपासून ते तोडणीपर्यंत सोळा हजार रुपये खर्च आला असून एकूण विक्रीतून साडे अठरा हजार रुपये मिळाले आहे. खाण्यास रुचकर व आरोग्यदायी असलेली झुकिनीची समीर शिंदे यांनी आपल्या एस.के.एस.अग्रीकल्चर शॉपच्या माध्यमातून आठ गुंठे क्षेत्रात लागवड करण्याचे ठरविले. तीन रुपये बीप्रमाणे १२०० बिया पुणे येथून आणल्या व मल्चिंग पेपरवरच्या बेडवर त्या झिकझ्याक पध्दतीने लावल्या.

बी उगवून येईपर्यंत बेडमध्ये ओलावा टिकून राहील यासाठी पाणी व्यवस्थापन केले. तिसऱ्या दिवसांपासून बी उगवण्यास प्रारंभ झाला. पाच दिवसांत पूर्ण बी उगवून आले. तेव्हापासून प्रत्येक तिसऱ्या दिवशी ठिबक सिंचनव्दारे पाणी देऊन जमीन मऊ व भुसभुशीत ठेवली. तसेच वाढीसाठी जैविक औषधे व जिवाणू जन्य खते, स्लरी ठिबकव्दारे पिकास दिल्या. प्रत्येक आठवड्याला एन. पी. के. खते प्रमाणात सोडली. कीड नियंत्रणासाठी जैविक औषधांचा वापर केला, असे समीर यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

अशी केली लागवड

१. मशागत करताना फणणी, रोटरने ढेकळे फोडली

२. माती मऊ व भुसभुशीत करून घेतली.

३. त्यावर बेड पाडून ड्रीप व मल्चिंग पेपर अंथरले

४. १५:१५:१५ सिलिकॉन व सॉईल चार्जर खते वापरली

झुकिनीची फळधारणा लवकरच होते. ३३ व्या दिवशी २० किलो फळ विक्रीसाठी तोडण्यात आले. त्यास मोशी (पुणे) येथे भाजी मार्केटमध्ये ८० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. चार मेपर्यंत शिंदे यांनी ६५० किलो उत्पादन घेतले असून, त्यास ८० रुपयांपासून तर ३० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. तसेच उत्पादन जूनपर्यंत मिळत राहणार आहे.

- समीर शिंदे, झुकिनी उत्पादक

असा होतो उपयोग

झुकिनी निरनिराळ्या पद्धतीने शिजवून भाजी करून तसेच इतर टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी, गाजर यासारखे ही भाजीत टाकून खाण्याची पद्धत आहे. तसेच ते कच्चे खाण्यासही चवदार लागते. तर तिचा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही उपयोग होतो. यामुळे मोठमोठ्या हॉटेलांमधून झुकिनीला मोठी मागणी आहे.

झुकिनीविषयी थोडेसे....

झुकिनी या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका येथील आहे. इसवी सन १५००च्या सुमारास इटालियन लोकांनी या भाजीच्या लागवडीत अधिक सुधारणा करून त्यास झुकिनी असे संबोधले. झुकिनी हे इटालियन नाव आहे. इटलीतून या भाजीचा प्रसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मेक्‍सिको, फ्रान्स, तुर्कस्तान, ब्राझील, चीन, जर्मनी आणि भारत आदी देशांत झाला. झुकिनी हे समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने ओळखले जाते. त्याची शास्त्रीय नावे अनुक्रमे कुकुरबिटा मॅझिमा आणि कुकुरबिटा पेपो, अशी आहेत. दोन्ही प्रकारांतील झाडे बुटकी, झुडूप वजा असतात.

Web Title: By Studying Internet Farmer Got A Huge Production Of Foreign Zucchini

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top