अवघ्या 50 हजारांत 'बायपास'

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 1 जानेवारी 2019

छातीत दुखू लागल्याने मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. बायपास करावी लागेल, असे वाटलेच नव्हते. त्यासाठी दोन लाख रुपये कुठून जमावयाचे याची चिंता होती. परंतु, येथे मला केवळ 50 हजार रुपये भरावे लागले. तेही इतरांकडून जमविले.'' 

- जयंत दरवडे, रुग्ण 

पुणे : दिवसभर रिक्षा चालवून जयंत रात्री घरी आले, अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. जयंत आणि त्यांच्या पत्नीने तत्काळ महापालिकेचे कमला नेहरू हॉस्पिटल गाठले. जयंत यांची अवस्था पाहून डॉक्‍टरांनी उपचार सुरू केले. त्याच वेळी जयंतला हृदयविकाराचा झटका आला. एरवी रुग्णाला इतर हलविण्याचा सल्ला देणाऱ्या महापालिकेच्या डॉक्‍टरांनी जयंतच्या तातडीने चाचण्या केल्या. तेव्हा हृदयाची शस्त्रक्रिया करण्यावाचून पर्याय नसल्याचे निष्पन्न झाले. संभाव्य खर्चाच्या धास्तीने जयंत प्रचंड घाबरला. मात्र, जयंतला धीर देत डॉक्‍टरांनी तीन-साडेतीन तासांत त्याच्या हृदयाची यशस्वी बायपास केली. 

खासगी रुग्णालयात अडीच-तीन लाख रुपयांत होणारी ही शस्त्रक्रिया 50 हजार रुपयांत झाली. रिक्षाचालक असलेले जयंत दरवडे (35) यांची बायपास शस्त्रक्रिया शक्‍य होऊ शकली ती कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उभारलेल्या नव्या सुविधेमुळे. गरीब रुग्णांना दिलासा देणारी ही योजना यशस्वी झाली असून, गेल्या काही दिवसांत या हॉस्पिटलमध्ये 14 जणांवर हृदयशस्त्रक्रिया झाली. येथे रोज पाच-सहा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याइतकी सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे. शहरी-गरीब योजनेंतर्गत रुग्णांना 50 हजार रुपयांतच ही सुविधा मिळत आहे. शहरी-गरीब योजनेचे पत्र नसलेल्या रुग्णांना एक लाख रुपये घेतले जातात. 

शहरात हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे गेल्या वर्षात कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये तपासणी केलेल्या रुग्णांच्या आकड्यांवरून दिसून आले आहे. खासगी रुग्णालयांतील खर्च अनेकांना परवडत नसल्याने त्यांना उपचार घेणे शक्‍य होत नाही. अशा रुग्णांसाठी या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे ऍन्जिओग्राफी आणि ऍन्जिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध झाली. मात्र, बायपास शस्त्रक्रियासाठीची सुविधा नसल्याने गरीब रुग्णांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वस्तात बायपास करता यावी, यासाठी महापालिकेने खासगी भागीदारीतून ही सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उभारली असून, तिची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. लवकरच महापालिकेच्या आणखी एका रुग्णालयांत अशी सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 

गरीब रुग्णांना स्वस्तात बायपास येईल, यासाठी ही सुविधा सुरू केली. रोज पाच ते सहा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याच्या दृष्टीने यंत्रणा उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्‍यक तपासणी आणि तज्ज्ञांची सोय केली असून, शहरी गरीब योजनेतील रुग्णांना अधिक सवलत दिली जाते''. 

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका 

कमला नेहरू हॉस्पिटलच्या कॅथलॅबमधील 2018 मधील रुग्ण 
हृदयविकाराबाबत तपासणी 
16,000 
-------- 
ऍन्जिओग्राफी 
750 
----- 
ऍन्जिओप्लास्टी 
250 
----- 
बायपास झालेले रुग्ण 
14 
----- 

हॉस्पिटलमधील यंत्रणा 
हृदयविकार तज्ज्ञ 

---- 
हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ 

--- 
रोजची बायपासची क्षमता 
5-6 रुग्ण 

Web Title: Bypass Surgery with 50 Thousand Rupees