कॅबचालकांच्या संपामुळे प्रवासी वेठीस !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे - कॅबधारक आणि कंपन्यांमधील वादांमुळे काही चालकांनी मंगळवारी अचानक संप केल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. काही भागात चढ्या दराने कॅब उपलब्ध झाल्या तर, काही ठिकाणी कॅबच उपलब्ध झाल्या नाहीत. सुमारे तीन ते पाच हजार कॅबचालकांनी संपात भाग घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. 

पुणे - कॅबधारक आणि कंपन्यांमधील वादांमुळे काही चालकांनी मंगळवारी अचानक संप केल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. काही भागात चढ्या दराने कॅब उपलब्ध झाल्या तर, काही ठिकाणी कॅबच उपलब्ध झाल्या नाहीत. सुमारे तीन ते पाच हजार कॅबचालकांनी संपात भाग घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. 

कॅब कंपन्या आणि चालकांत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. एका कॅब कंपनीच्या बाहेर नुकतेच आंदोलनही झाले होते. त्या वेळी एका चालकाने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. कॅब कंपन्यांकडून चालकांना नियुक्त करताना उत्पन्नाबाबत देण्यात येणारे आश्‍वासन आणि प्रत्यक्षात चालकाला मिळणारे उत्पन्न, या मध्ये तफावत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. तर, चालकाशी करार करताना त्यांना तो समजावून सांगितला जातो, असे कॅब कंपन्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी अचानक झालेल्या संपामुळे विमाननगर, वाघोली, खराडी, हिंजवडी, वाकड, औंध आदी भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. पुणे विमानतळ, पुणे स्टेशन तसेच हिंजवडी आयटीपार्कमधून ये-जा करणाऱ्यांनाही या संपाचा फटका बसला. 

या बाबत स्वराज चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गुरू कट्टी म्हणाले, ‘‘दरमहा दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे कंपन्यांनी चालकांना सांगितले होते. प्रत्यक्षात त्या पेक्षा खूपच कमी उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गाडीचे हप्ते, कॅब कंपन्यांचे कमिशन, देखभाल- दुरुस्तीचा खर्च भागवताना चालक मेटाकुटीला आले आहेत. म्हणून अनेक चालक संघटितपणे संपावर गेले आहेत.’’

दरम्यान, चालकांच्या एका गटाने प्रवाशांना सेवा पुरविली नाही. त्यामुळे काही भागात प्रवाशांना आज कॅब उपलब्ध झाली नाही. परंतु, शहराच्या अनेक भागात सेवा सुरळीत होती, असे ‘ओला’ आणि ‘उबर’ने म्हटले आहे.

प्रवासी म्हणतात....
सचिन कुलकर्णी - लोहगाव विमानतळावर मला जायचे होते. परंतु, औंधमध्ये मला कॅब उपलब्ध नव्हती. त्यामुळे रिक्षाने जावे लागले अन त्यासाठी ३३५ रुपये मोजावे लागले. कॅब असती तर, १५०- २०० रुपयांत मी पोचलो असतो. 

स्मिता सिन्हा - वाघोलीतून ऑफिसला मी दररोज कॅबने जाते. परंतु, आज मला ॲपवर कोणतीही कॅब दिसत नव्हती. सातत्याने प्रयत्न करूनही कॅब मिळाली नाही. त्यामुळे ४५ मिनिटांनंतर रिक्षाने मी ऑफिसला गेले. 

रितेश जैन - पुणे रेल्वे स्थानकावर पोचल्यावर कॅबच्या पिकअप पॉईंटला मी पोचलो. परंतु, तेथे कॅब नव्हती. त्यामुळे रिक्षा करून मला घरी जावे लागले.

Web Title: Cab Driver Strike Passenger