ढेबेवाडी एकाच रात्री चार नळयोजनांच्या केबल चोरीला

ढेबेवाडी एकाच रात्री चार नळयोजनांच्या केबल चोरीला

Published on

नळ योजनांच्या केबल एकाच रात्रीत चोरीस

ढेबेवाडी भागात सत्र सुरूच; चार ग्रामपंचायतींना भुर्दंड, कृत्रिम पाणीटंचाई

ढेबेवाडी, ता. २५ : परिसरात नळयोजनांसह कृषी पंपांच्या केबल चोरीचे सत्र सुरूच आहे. काल एकाच रात्री विविध गावांतील चार सार्वजनिक नळयोजनांच्या विहिरीतील पंपांना जोडलेल्या केबल चोरट्यांनी कापून नेल्याने खळबळ उडाली. केबलमधील तांब्याच्या तारेसाठी चोऱ्या होत असून, पोलिसांना अद्यापही चोरट्यांपर्यंत पोहचण्यात यश आले नाही.
विभागातील बहुतांश गावातील नळ पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी गावाबाहेर, शिवारात किंवा वांग नदीच्या पात्रालगत आहेत. शेतीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांचे पंपही नदी परिसरातच आहेत. दिवसा आणि रात्रीच्या वेळीही त्या परिसरात लोकांची फारशी वर्दळ नसते. चोरटे याचा गैरफायदा उठवत दिवसभर नदीकाठाने आणि शिवारातून फिरून पंपांना जोडलेल्या केबलचा अंदाज घेत आहेत. रात्रीच्या सुमारास अशा केबल कापून लंपास केल्या जात आहेत. साधारणपणे पंपापासून स्टार्टरपर्यंतच्या केबल कापल्या जात आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी किंवा शेतकरी पंप सुरू करायला गेल्यावर हा प्रकार निदर्शनास येत आहे. गेल्या महिन्यात ढेबेवाडी, धामणी, भोसगाव परिसरातील अनेक पंपांच्या केबल चोरीला गेल्या. यातील काही घटनांच्या तक्रारी येथील पोलिस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. अजूनही हे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. कालरात्री मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, साबळेवाडी येथील वांग नदीकाठच्या नळयोजनांच्या विहिरीवर बसविलेल्या जुन्या- नव्या पंपांच्या केबल चोरट्यांनी कापून नेल्या. सकाळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा लक्षात हा प्रकार आल्यावर पोलिसांना कळविले. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, हवालदार नवनाथ कुंभार, रणजित पाटील, सरपंच उमादेवी भोई, पोलिस पाटील राजू लोहार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंपांच्या केबल चोरीस गेलेल्या गावात नवीन केबल खरेदी व जोडणीस वेळ लागत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. केबल महागडी असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

---------
(चौकट)
------------

सर्तकतेचे आवाहन

केबल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ढेबेवाडी पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. विहिरींवरील असणाऱ्या मोटारीच्या वायर कापून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी विहिरी व नदीवरील पंपांच्या परिसरात संशयित व्यक्ती फिरताना आढळल्यास पोलिस पाटील किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. विचारपूस करावी किंवा शक्य झाल्यास मोबाईलवर फोटो टिपावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

B08155
मंद्रुळकोळे : केबल चोरीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी घटनास्थळी पाहणी करताना डॉ. प्रवीण दाईंगडे, रणजित पाटील आदी.

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com