

चमत्कार की निव्वळ योगायोग
तो एक साधासुधा सोमवार होता; पण त्या सकाळी घडलेली एक छोटीशी घटना आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभराची आठवण बनून राहणार आहे. माझा भाचा निखिल पुण्याहून सातारा जिल्ह्यातील लालगुण या छोट्याशा गावाकडे निघाला होता. गावाकडे जाण्यासाठी दोन घाट पार करावे लागतात. वळणावळणाचे रस्ते, तीव्र चढ-उतार आणि अरुंद वळणे... त्यातून एक्सईव्हीसारखी गाडी चालवणेही फार सोपे नाही.
घाटातील एका वळणावर अचानक निखिलला गाडी थांबवावी लागली. कारण रस्त्याच्या अगदी मधोमध एक छोटंसं, नुकतंच जन्मलेलं अवघं आठ दिवसांचं वासरू उभं होतं. निखिलने हॉर्न वाजवला. त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण वासरू काही केल्या जागचं हलत नव्हतं. काही वेळात आसपासचे काही लोकही जमा झाले. सगळ्यांना वाटलं, कदाचित हे वासरू आईपासून दूर आलं असावं. निखिल गाडीतून खाली उतरला आणि त्याला सुरक्षितपणे बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला; पण त्यानंतर जे घडलं, ते पाहून तिथे जमलेले सगळेच अवाक् झाले. ते छोटंसं वासरू निखिलजवळ आलं आणि अक्षरशः त्याला चिकटून राहिलं. तो कितीही प्रयत्न करत होता, तरी ते त्याची साथ सोडायलाच तयार नव्हतं.
निखिल पुन्हा गाडीत बसण्यासाठी ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडतो, तोच ते वासरू चक्क गाडीत शिरलं आणि मागच्या सीटवर जाऊन निवांत बसलं! क्षणभर कुणालाच काय बोलावं हे सुचेना. आठ दिवसांचं ते छोटंसं वासरू स्वतःहून गाडीत बसून गेलं होतं! निखिलला काळजी वाटली की कदाचित कुणी त्याचा शोध घेत असेल. त्याने पुन्हा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथल्या लोकांनी एक अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट सांगितली. काही लोक नर वासरांना डोंगरात सोडून देतात, कारण त्यांना त्यांचा सांभाळ करायचा नसतो. विशेषतः आईचं दूध काही महिने वासराला द्यावं लागतं, हे त्यांना नको असतं. हे ऐकून निखिलला त्या छोट्याशा जिवाला तिथे सोडून देणं शक्यच झालं नाही. त्याने आपल्या या छोट्या प्रवाशाला स्वीकारलं. आम्हाला व्हिडिओ कॉल केला आणि काय करायचं याबद्दल विचारलं. खरं सांगायचं तर पुढचा निर्णय घ्यायला आम्हाला फार वेळ लागलाच नाही. आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचं आगमन झालं होतं. निखिलने त्याला घेऊन आमच्या वडिलोपार्जित फार्महाऊसकडे प्रयाण केलं; पण आश्चर्यांची मालिका अजून संपलेली नव्हती. फार्महाऊसवर पोहोचल्यावर निखिलने गाडीचा दरवाजा उघडला. ते छोटंसं वासरू जणू त्या क्षणाचीच वाट पाहत होतं. ते पटकन गाडीतून खाली उतरलं आणि थेट घराच्या दिशेने चालू लागलं. दार उघडं होतं. ते आत शिरलं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरून त्याने अक्षरशः आपल्या नव्या घराची पाहणी केली आणि शेवटी हॉलमध्ये येऊन अगदी निवांतपणे विसावलं.
आम्ही त्याचं नाव ठेवलं नंदी. आजही मनात एकच प्रश्न येतो नंदी आमच्याकडे आला की त्याने आम्हाला निवडलं?
हा योगायोग होता की चमत्कार? ते मी देवावरच सोपवते; पण एवढं मात्र खरं... एका घाटाच्या वळणावर एका आठ दिवसांच्या वासराने आमची गाडी थांबवली. ते स्वतःहून गाडीत बसलं. आमच्यासोबत प्रवास केला. आमच्या फार्महाऊसवर पोहोचलं आणि कुणाच्याही सांगण्याशिवाय थेट घरात शिरून तिथे आपली जागा करून बसलं. कधी कधी आयुष्य आपल्याला काही गोष्टी शोधायला लावत नाही. त्या स्वतःच आपल्याला शोधत येतात. आमच्यासाठी नंदी असाच एक अनपेक्षित, गोड आणि मनाला स्पर्शून जाणारा आशीर्वाद आहे. आता आम्ही सगळेच त्याला भेटण्यासाठी आतुर आहोत. तुमचा कधी आमच्या फार्महाऊसला येण्याचा विचार असेल, तर नक्की कळवा. कदाचित तुम्हालाही भेटेल. तो छोटासा जीव, ज्याने आम्हाला आपलं कुटुंब म्हणून निवडलं.
- कोमल केंजळे (मचिंदर), ललगुण,
W60757
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.