esakal | Canal Committee Meeting : पुण्यातील 'या' पाणी प्रश्नांचा अजित पवार करणार, पाठपुरावा
sakal

बोलून बातमी शोधा

Canal committee meeting in Pune.jpg

- शहराला मिळणार पुरेसे पाणी
- रेंगाळलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागणार
- बोगद्यातून देणार पाणी
- कालव्याच्या जागी रस्ते बांधण्याचा प्रस्ताव
- हिंजवडी वाहतूक समस्या 
- टेमघर पाणी गळती रोखणार 
- पाण्याचा वापर काटकसरीने वापरण्याच्या सुचना

Canal Committee Meeting : पुण्यातील 'या' पाणी प्रश्नांचा अजित पवार करणार, पाठपुरावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आज पुण्यात पार पडली. शहर आणि ग्रामीण भागासाठी पाण्याची अडचण येणार नाही, अशा प्रकारचा मध्य काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत वेगवेगळ्या नियोजित प्रकल्पांचे प्रस्ताव देण्याच्या सूचना अजित पवार यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

शहराला मिळणार पुरेसे पाणी
भामा-आसखेड प्रकल्पाच्या बंद पाईपलाईनमधून पाणी पुरवठा करण्याचे काम रेंगाळले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्रकल्पबाधितांना हेक्‍टरी 15 लाख रुपये देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. त्याची अंमलबजावणी पूर्ण करण्यात येईल. त्यातून शहराला सुमारे अडीच टीएमसी पाणी मिळेल. तसेच ग्रामीण भागाला पाणी देण्यात येणाऱ्या खडकवासला प्रकल्पावरील पाण्याचा ताण कमी होईल.'' 

रेंगाळलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागणार
मुंढवा येथील सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प सध्या कार्यक्षमतेने चालत नाही. जायका प्रकल्पासाठी ज्या काही जागा अधिग्रहीत करायच्या आहेत, त्याचे काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यामुळे रेंगाळलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागतील. 

बोगद्यातून देणार पाणी
खडकवासला प्रकल्पापासून फुरसुंगीपर्यंत बंद पाईपलाईन ऐवजी बोगदा काढून पाणी देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. बोगदा काढून पाणी दिल्यामुळे सुमारे दोन ते अडीच टीएमसी पाण्याची बचत होईल. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने निम्मा निम्मा खर्च उचलावा. याबाबत आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

कालव्याच्या जागी रस्ते बांधण्याचा प्रस्ताव
सध्याच्या कालव्याच्या जागेचा वापर तेथे रस्ते बांधून वाहतुकीसाठी करता येईल. 

हिंजवडी वाहतूक समस्या 
हिंजवडी येथील कासारसाई मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा आठ किलोमीटरचा भाग रस्त्यात परिवर्तन करून तेथील जागा वाहतुकीसाठी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत. या भागात चार पदरी रस्ता झाल्यास हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. 

टेमघर पाणी गळती रोखणार 
टेमघर प्रकल्पातून होणारी पाणी गळती रोखण्याबाबत येत्या जून महिन्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


पाण्याचा वापर काटकसरीने वापरण्याच्या सुचना
''पुणे शहर आणि ग्रामीण भागातील दोघांनाही जबाबदारीने काटकसरीने पाण्याचा वापर करावा. तसेच प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीने जाण ठेवून काम करावे.'' अशा सूचना पवार यांनी बैठकीत दिल्या.
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग या दोघांनी जबाबदारी ढकलण्याचे काम करू नये. पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल असे त्यांनी नमूद केले.

पुण्याच्या पाणी प्रश्नाबाबत काय म्हणतायेत चंद्रकांत पाटील

loading image