Vidhan Sabha 2019 : धरणांचे करार रद्द करून  दुष्काळग्रस्तांना पाणी द्या - ऍड. प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

विधानसभेच्या 288 जागा आम्ही लढवणार आहोत. निवडणुकीनंतर वंचित आघाडी विरोधात नव्हे, तर सत्तेत असेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

विधानसभा 2019
पुणे - टाटांच्या मुळशी धरणासह सहा धरणांचे करार रद्द करून या धरणांतील पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग व मराठवाड्याला द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केली. कोयना धरणाचे पाणीदेखील शेतीसाठी वापरता येईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

केवळ भावनिक राजकारण नको, तर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर राजकीय पक्षांनी बोलावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ऍड. आंबेडकर म्हणाले, ""सौर आणि पवन ऊर्जेचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे यापुढील काळात जलविद्युत ऊर्जा प्रकल्पांची गरज उरणार नाही. केंद्र सरकारच्या अहवालानुसार "नॅशनल ग्रीड'मध्ये वीज शिल्लक आहे. त्यामुळे जलविद्युत ऊर्जा प्रकल्पांचे पाणी शेतीसाठी वापरले, तर पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा सुजलाम्‌-सुफलाम्‌ होण्यास मदत होईल. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले, यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा राज्य सरकारने यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. वंचित आघाडी सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प निश्‍चितपणे हाती घेईल.'' 

मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्राला हे पाणी कशाप्रकारे देता येईल, याचे सादरीकरणदेखील या वेळी करण्यात आले. कोयना किंवा टाटांच्या धरणाचे पाणी फिरवणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य नसल्याची माहिती प्रशासन राज्य सरकारला देत आहे. मात्र, यातून राज्य सरकारची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

वंचित आघाडी विरोधात  नव्हे, तर सत्तेमध्ये येईल 
विधानसभेच्या 288 जागा आम्ही लढवणार आहोत. निवडणुकीनंतर वंचित आघाडी विरोधात नव्हे, तर सत्तेत असेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. निवडणुकीनंतर वंचित आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद असेल, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यावर ऍड. आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancel the dam contract and provide water to the drought affected people says praskash ambedkar