

इंदापूर, ता. ९ ः उजनी धरणावर प्रस्तावित असलेला सौरऊर्जा प्रकल्प तसेच जलसंपदा विभागाकडून काढण्यात आलेली खासगी मच्छीमारी ठेका प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १२ ऑगस्टला सोलापूर सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे.
निवेदनानुसार उजनी धरण हे राज्यातील मच्छीमारीसाठी महत्त्वाचे जलाशय असून, धरण कार्यक्षेत्रातील हजारो मच्छीमार, अडते व व्यापारी हे मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे उजनी धरणावर मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यास धरण कार्यक्षेत्रातील मच्छीमार कायमस्वरूपी उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. यासह उजनीचा पाणीसाठा सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रासाठी सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी महत्त्वाचा आहे. धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने उर्वरित पाणीसाठ्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यास मच्छीमारीसाठी आवश्यक जलक्षेत्र कमी होईल, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.
यासह जलसंपदा विभागाने ई-टेंडरद्वारे मच्छीमारीचा खासगी ठेका काढल्याने मच्छीमार, अडते आणि व्यापारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील सिंचन भवन येथे आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
मच्छीमारांसाठी गेल्या तीन वर्षांपासून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून उजनी धरणात दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मच्छीमारांवर वेळोवेळी आलेल्या संकटांमध्ये समितीने त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत केली असून, आता संबंधित मंत्र्यांनी मच्छीमारांच्या हिताचा विचार करून सौरऊर्जा प्रकल्प व खासगी मच्छीमारी ठेका रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तीन दिवस मच्छीमारी बंद
सरकारने मच्छीमारांच्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी याकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर, भिगवणसह उजनी परिसरातील मच्छीमार, अडते व व्यापारी हे ११, १२ आणि १३ ऑगस्ट या तीन दिवस मच्छीमारी बंद ठेवणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.